– किनगावजट्टू, लोणार, बिबीसह भुमराळा परिसरातील ग्रामस्थ संतप्त
चिखली/मेरा बु. (ब्रेकिंग महाराष्ट्र) – लोणार तालुक्यातील भुमराळा दरी येथील रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेला असून, या रस्त्यावरून साधे पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. लोणारसारख्या जागतिक प्रसिद्ध तालुक्याच्या गावातील हा रस्ता इतका खराब झालेला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी दोघेही झोपी गेले असावेत, अशी शंका निर्माण झाली असून, या भागातील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत. विद्यार्थी, ग्रामस्थ, आणि प्रवासी यांनी या रस्त्यावरून चालावे तरी कसे, वाहने न्यावीत तरी कशी, असा सवाल निर्माण झालेला आहे.
भुमराळा दरी येथील विद्यार्थी हे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी किनगावजट्टू, लोणार, बिबी येथे जातात. परंतु, येथील रस्ता अक्षरशः उखडला असून, आता पावसाळ्यात तर या रस्त्याने पायीदेखील चालता येत नाही. गावातील नागरिक, शासकीय कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनादेखील दैनंदिन जाणे-येणे करणे कठीण झालेले आहे. पंचायत समिती, तहसील, बँकेचे कामे करण्यासाठी जावे-यावे कसे, असा सवाल ग्रामस्थांना पडला असून, हे ग्रामस्थ खराब रस्ता पाहून लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना मनातल्या मनात शिव्या हासडत आहेत. शाळेने विद्यार्थ्यांना जाण्या येण्याकरिता दोन स्कूल बस दिलेल्या आहेत. परंतु, रस्ता चांगला नसल्याने या बसदेखील जाऊ शकत नाहीत. सर्वच रस्ता उखडला असून, पाणी व चिखलाने रस्ता भरलेला आहे. पावसाळ्याचे चार महिने या रस्त्याने जाणे-येणे करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. एखाद्या आजारी माणसाला दवाखान्यात न्यायचे म्हटले तरी दोन किलोमीटर नेण्याकरिता तर अक्षरशः जीवघेणी कसरत आहे. तरी, या भागाच्या आमदार, व इतर लोकप्रतिनिधींनी या रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घ्यावी, व तातडीने हा रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी गजानन मोरे, दत्तात्रय चौधरी, सतीश भोसले, संतोष मापारी, मधुकर मोरे, विशाल मोरे, सुरेश चौधरी व इतर ग्रामस्थांनी केलेली आहे.
भुमराळा येथील गजानन मोरे यांनी कळविले की, लोणार तालुक्यातील भुमराळा दरी येथील ६० ते ७० विद्यार्थी पायी अथवा सायकल , किंवा खाजगी वाहनांमध्ये दररोज किनगाव जट्टू,लोणार, बिबी येथील शाळा कॉलेज मध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात . शाळेत,कॉलेजात जात असतात. त्याच बरोबर गावातील लहान मोठे व्यापारी , भाजीपाला विकणारे , काही शासकीय कामकाज , खाजगी , बँक ,तहसील ,पंचायत समिती , दवाखाना आदी कामासाठी या स्त्यावरून जाणे येणे करावे लागते . तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी दररोज दोन स्कुल बस लावलेल्या आहेत. मात्र रस्त्या अभावी त्याही गावात येत नाहीत . संध्या गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने सर्व रस्त्यावर चिखल पसरलेला आहे. रस्त्यावर पसरलेला चिखल व घाण पाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे पायी जाणाऱ्या लोकांच्या अंगावर उडून कपडे खराब होतात , या बाबतीत अनेक वेळा गावकऱ्यांनी संबंधित विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र अधिकारी वर्गांनी याकडे जाणुन बुजून दुर्लक्ष केले , त्यातच पठारी व लोकप्रतिनिधी याकडे डोळे झाक करीत असल्याने आजारी रुग्णाना गावकऱ्यांना दरवर्षी पावसाळ्यात फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे . तरी वरीष्ठ संबंधित विभागाने तात्काळ दखल घेवून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी गजानन मोरे यांनी केलेली आहे.