बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र):- मोताळा तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन भाचीला घरी स्वयंपाक बनविण्यासाठी बोलावून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला व जीवेमारण्याची धमकी देवून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. यामध्ये अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. ही बाब 23 जुलै रोजी तिच्या आईला समजताच त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. यावरुन पोलिसांनी मामाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दितील येणाऱ्या मोताळा तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन भाचीला तिचा सख्खा मामा वय ३० याने घरी स्वयंपाक बनविण्यासाठी बोलावले.
यावेळी घरी कोणी नसल्याचे पाहून संधी साधून नराधम वासनांध मामाने सख्ख्या भाचीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. याबाबत कोठेही वाच्यता केल्यास तुला व तुझ्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकी पोटी घडलेला प्रकार पीडितमुलीने कोणालाही सांगितला नाही. त्यामुळे मामाने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. यामध्ये ती गर्भवती राहिली. ही बाब तिच्या आईला २३ जुलै रोजी कळताच आईने मुलीसह पिंपळगाव रोजा पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. यावेळी पोलीसांनी पिडीत मुलीचे जबाब व वैद्यकीय तपासणी अहवालावरुन मामा विरुध्द कलम ३७६(२), (फ), ३७६(२)(एन), ३७६(३), ४५२, ५०६ भा.दं.वि. सहकलम ४, ६ बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सतीश आडे व पिंपळगाव राजा पोलीस करीत आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी मामास अटक केली आहे.