आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आषाढी एकादशी दिनी सुमारे लाखावर भाविकांनी श्रीचे दर्शनास हरीनाम गजर करीत गर्दी करीत दर्शन घेतले. राज्य परिसरातून आलेल्या भाविकांनी श्रीचे संजीवन समाधीचे दर्शन घेवून नगरप्रदक्षिणा पावसाचे सरीत पूर्ण केली. दरम्यान श्रींचा वैभवी चांदीचा मुकुट पालखीत ठेवून पूजा बांधीत श्रींचे पालखीची एकादशी दिनी परंपरेने ग्रामप्रदक्षिणा आणि हजेरी मारुती मंदिरात दिंड्यांचा हजेरीचा कार्यक्रम हरिनाम गजरात झाला.
आळंदी मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत एकादशी दिनी श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य झाला. या प्रसंगी पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त विकास ढगे पाटील, पालखी सोहळा मालक ऋषिकेश पवार आरफळकर, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, उद्धव रणदिवे,मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरु, स्वप्नील कुऱ्हाडे,शिक्षण मंडळ माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, सेवक, पदाधिकारी, आळंदीकर ग्रामस्थ, खांदेकरी उपस्थित होते. यावेळी परंपरेने हजेरीचे कार्यक्रमात पालखी सोहळ्याचे परंपरेने प्रथम आळंदी संस्थान तसेच कुऱ्हाडे परिवार, नाईक परिवार यांचे वतीने देखील नारळ प्रसाद आणि खिचडी वाटप करण्यात आले. मंदिरात दर्शन बारीतुन रांगा लावून भाविकांनी दर्शनास गर्दी करीत श्रीचे समाधी दर्शन घेतले.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीकांत लवांडे, सोमनाथ लवंगे, संजय रणदिवे आदींनी भाविकांच्या दर्शनासाठी प्रभावी नियोजन केले. सुमारे लाखावर भाविकांनी आळंदी मंदिरात श्रीचे दर्शन घेतले. आळंदी पोलिस, मंदिरा तील सुरक्षा रक्षक,सेवक-पोलिस यांनी बंदोबस्त ठेवला. यासाठी पोलिस निरीक्षक रमेश पाटील,पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांचेसह आळंदी पोलिसांनी परिश्रम घेतले. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्यासाठी सेवकांनी परिश्रम घेतले. अनेक भाविकांनी वारकरी यांना फराळाचे वाटप केले. आळंदी संस्थांनच्या वतीने पिण्याचे पाण्याची व्यवस्था, खिचडी, केळी वाटप करण्यात आले. मंदिरात आकाश पुष्प सजावट करण्यात आली होती.
एकादशी निमित्त आलेल्या भाविक-वारकरी यांनी येथील मंदिर आणि नगर प्रदक्षिणा हरीनाम गजरात केली. येथील मंदिर परिसरात थेट दुचाकी वाहने आणि रस्त्यावर वाहनांचे पार्किंग झाल्याने आळंदीत भाविकांना गैरसोयीस सामोरे जावे लागले. वाहतूक पोलिसांची वाहतूक सुरळीत करण्यास पावसात भिजत दमछाक झाली. वाहन चालक वाहने पुढे नेण्याचे प्रयत्नात वाहतूक कोंडी वाढली. बेशिस्त वाहन चालकांमुळे यात भर पडली. आळंदी व दिघी पोलिसांनी सुरळीत वाहतूक होण्यास परिश्रम घेतले. मंदिर परिसर,प्रदक्षिणा मार्ग,पूल, चाकण चौक,मरकळ रोड या ठिकाणी ये-जा करताना भाविकांना त्रासदायक झाले. मंदिर परिसरात ये-जा करताना काहीशी गैरसोय झाली. प्रदक्षिणा मार्गावरून श्रींचे पालखीची हरिनाम गजरात नगर प्रदक्षिणा झाली. भाविकांची अनवाणी पायाने होणारी नगर प्रदक्षिणा आळंदीतील प्रशस्त नगरप्रदक्षिणा मार्ग विकसित झाल्याने सुखकर झाली मात्र वाहतूक कोंडी कायम राहिली. किमान गर्दीचे वेळी आळंदीतील वाहतुकीचे एकेरी मार्ग वाहतूक करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.
हरिपाठ कीर्तनसेवेस उत्साही प्रतिसाद
ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साही वातावरणात साजरी झाली. माउली मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत हरिपाठ कीर्तन सेवेस भाविकांनी गर्दी केली. श्रींचे पालखीचे आषाढीस पंढरपूरला जाण्यास प्रस्थान झाल्यानंतर ते श्रींची पालखी आळंदीत परत येई पर्यंत येथील विष्णुबुवा चक्रांकित महाराज यांचे परिवाराचे वतीने कीर्तन सेवेची परंपरा आहे. श्रींचे विना मंडपात हरिपाठावर आधारित मंदिरात कीर्तन सेवा परंपरा आहे. एकादशी दिनी हजेरी मारुती मंदिरात देखील त्यांचे वतीने कीर्तनसेवा झाली. हजेरी मारुती मंदिरात नगरप्रदक्षिणे दरम्यान श्रींचे वैभवी पालखीचे दर्शनास भाविकांची गर्दी झाली. दरम्यान प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी श्रींचे पालखीत दर्शन घेतले. श्रींचे पालखीचे मंदिरात नगरप्रदक्षणेनंतर आगमन झाले. यावेळी मानक-याना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद देण्यात आला.
थोरल्या पादुका मंदिरात पालखी सोहळ्याचे स्वागत आरती
आळंदीत माऊलींचा सोहळा आगमना पूर्वी थोरल्या पादुका मंदिर येथे श्रींचे वैभवी सोहळ्याचे स्वागत ट्रस्ट चे वतीने अध्यक्ष अॅड. विष्णु तापकीर यांचे हस्ते पादुका पूजा, श्री माऊलीची आरती करण्यात आली. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, पालखी सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे पाटील, मानकरी, विणेकरी सेवक,चोपदार यांचा सत्कार अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी खजिनदार दत्तात्रय गायकवाड, मनोहर भोसले, शांताराम तापकीर, ह.भ.प. रमेश महाराज घोगडे, ह.भ.प राजाराम महाराज तापकीर, ह.भ.प. गजानन महाराज सोनुने, एकनाथ देवकर उपस्थित होते. यावेळी ॲड तापकीर यांचे हस्ते मान्यवरांना शाल, उपरणे, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. मंदिर व मंदिर परीसरात अनुष्का केदार हिने लक्षवेधी रंगावली व पुष्प सजावट केली होती. यावेळी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.
भाविकांसाठी गोड लापशीचे प्रसाद
राजे शिवछत्रपती विकास प्रतिष्ठान काळेवाडी धाकट्या पादुका यांच्या वतीने दरवर्षी पालखी आळंदीत दाखल होत असताना भाविकांसाठी गोड लापशीचे प्रसाद वाटप करण्यात येते याप्रसंगी सुमारे पाच हजारावर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष बंडूनाना काळे , उपाध्यक्ष महेश गायकवाड, खजिनदार राधाकिसन निकस, मुन्ना शर्मा, भाऊसाहेब जाधव, शांताराम तापकीर, विलास आवळे, अजय काळे, दिलीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.