Jalgaon KhandeshMaharashtraShahada

राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी माजी जि.स.सभापती व शेकडो नागरिकांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन!

 शहादा जिल्हा नंदूरबार (प्रतिनिधी) विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुरुस्तीसाठी शहादा तालुक्यातील डामरखेडा गावाजवळील गोमाई नदीच्या पुलाजवळ जिल्हा परिषद माजी कृषी सभापती अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवार 24 जुलै रोजी सकाळी 10वाजता तीव्र स्वरूपाचे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलन परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनाची अधिकाऱ्यांनी दखल घेत घटनास्थळी पोहचून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन आश्वासन दिल्याने सुमारे दोन तास सुरु असलेले आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले.

सकाळपासूनच प्रकाशा व डामरखेडा परिसरातील असंख्य गावातील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर नागरिक डामरखेडा येथे पोहोचले होते.प्रकाशा तालुका शहादा येथील पुलाच्या दोन्ही बाजूस डामरखेडा येथील गोमाई नदी पुल पासून तर डामरखेडा गावापर्यंतअसलेला रस्ता पुरता खराब झाले असून मोठ मोठाले जीवघेणे खड्डे झाले आहेत.अनेक वेळा तक्रारी आंदोलने करून देखील ठेकेदार व अधिकारी गांभीर्य लक्षात घेत नव्हते. खोटी व उडवाउडवीची उत्तरे देत होती. रस्त्यामुळे अनेकांचे अपघातात बळी गेले आहेत.हा सारा प्रकार बघता शेवटी जनआंदोलन करावे लागले. नागरिकांनी रस्त्यावरच रास्ता रोको आंदोलन करून रस्ता पूर्णतः बंद केलेला होता.पोलीस व महसूल प्रशासनाने आदल्या दिवसापासूनच सतर्कता बाळगली होती. प्रकाश पूल व डामरखेडा पुलाजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता.नंदुरबार येथील अनेक पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते.

या आंदोलनात माजी जिल्हा परिषद कृषी सभापती अभिजीत पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामचंद्र पाटील शहादा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वर पाटील डामरखेडा येथील सरपंच दत्तू नथू पाटील उपसरपंच रवींद्र ठाकरे प्रकाशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरी दत्तू पाटील माजी नगरसेवक लोटन धोबी विष्णू जोंधळे नजमुद्दिन खाटीक निलेश मराठे माकपाचे तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड सह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.अधिकारी ठेकेदार व प्रशासनाच्या विरोधात कमालीचा रोष व्यक्त करून निषेध केला जात होता.घोषणाबाजी करीत होते.जोपर्यंत जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही असा निर्धार केल्याने एम.एस.आय.डी.सी.च्या अधिकारी श्रीमती दळवी प्रांत अधिकारी डॉक्टर चेतनसिंग गिरासे तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी भेट घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आश्वासन दिल्याने आंदोलन थांबवण्यात आले.लागलीच रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

अपघात झाल्यास ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत..
विसरवाडी ते सेंधवा हा साडे चारशे कोटी रुपयाच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम तीनशे कोटी रुपयात करण्यात आले. ठेकेदाराने मनमानी कारभार चालवून रस्त्याचे काम अपूर्ण असतांना जुने काम करत नाही अशी उत्तरे देत होता .रस्त्यावरील खड्ड्यांमुळे निष्पापांचे बळी गेले. नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले .शेतकरी कामात अडचण निर्माण करतात असा खोटा आरोप केला जात होता. शेवटी हे जनतेचे आंदोलन होते. जनता अधिकाऱ्यांना जाब विचारत आहे. अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केली जाईल भविष्यात या रस्त्यावर अपघात झाल्यास पंचनामे करून ठेकेदारवर गुन्हे दाखल करावेत व शेतकऱ्यांना त्याची भरपाई त्वरित द्यावी. या तीन मागण्या मान्य करुन आश्वासन दिले.

आंदोलन तात्पुरते स्थगीत..
आंदोलन तात्पुरते थांबवले असून येत्या सात दिवसात रस्ता दुरुस्तीसह मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर गावागावांमध्ये जाऊन दवंडी पिटवून मोठे जन आंदोलन केले जाईल. हा आंदोलनाचा पहिला टप्पा होता.या पेक्षा तीव्र आंदोलन होईल अशी प्रतिक्रिया अभिजित पाटील यांनी दिली.याव्यतिरीक्त हरी दत्तू पाटील यांनीदेखील अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामासंदर्भात जाब विचारला. पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून नंदुरबार कडून शहादा कडे येणारी वाहतूक वाका चार रस्ता तळोदा-अलमलाड- बोरद मार्गे वळवली होती.शहादा कडून नंदुबार कडे जाणारी वाहतूक दोंडाईचा मार्गे वळवली होती सर शिरपूर मार्गे जाणारी वाहतूक दोंडाईचा शिंदखेडा मार्गे वळवली होती.त्यामुळे रस्त्यावर वाहने दिसत नव्हती.मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता, हे विशेष!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!