डॉ. राजेंद्र शिंगणेंचे ‘पिछे मूड..’?; अजितदादांची साथ सोडून ‘साहेबां’कडे परतणार?
– फोन ‘स्वीचऑफ’ करून डॉ. शिंगणे यांनी ताणली बुलढाण्यातील पत्रकारांची उत्सुकता!
वर्धा (प्रकाश कथले) – बुलढाणा जिल्हा सहकारी बँक अडचणीत आल्यामुळे नाईलाजाने अजितदादांसोबत गेलो. आता सरकारने या बँकेला तीनशे कोटी रूपये दिले आहेत. परंतु, ‘आदरणीय शरद पवार हे माझ्यासाठी आदरणीयच असून, ते आदरणीयच राहतील’, अशी कबुली माजी मंत्री तथा सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. त्यानंतर ते अजितदादांच्या गटातून पुन्हा शरद पवारांकडे परत येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यातच त्यांनी आपला मोबाईलदेखील बंद करून ठेवल्याने याप्रश्नी राजकीय तर्कांना उधाण आले. दरम्यान, अजितदादा गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, की ‘शिंगणेसाहेब अजितदादांच्यासोबतच राहणार असून, ते तुतारी हाती घेणार नाहीत. शरद पवार यांच्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला म्हणजे, ते त्यांच्याकडे गेले असा अर्थ होत नाही. आम्हा सर्वांना साहेबांबद्दल काल होता तसाच आदर आजही आहे, त्यात वावगे काहीच नाही’, असे स्पष्टीकरणही या वरिष्ठ नेत्याने दिले.
वर्धा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख यांचा अमृत महोत्सव सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे हजर होते. माजी मंत्री आ. डॉ. शिंगणे हेदेखील या कार्यक्रमाला हजर होते. याबाबत बोलताना डॉ. शिंगणे यांनी सांगितले, की ‘मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे आणि नाइलाजाने मी अजितदादांसोबत गेलो. आज या सहकारी बँकेला राज्य सरकारने तीनशे कोटी दिले आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहील. पुढे ते म्हणाले, की ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव समितीत मी होतो, त्यामुळे मी या कार्यक्रमाला आलो. आदरणीय पवार साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही कार्यालयात बसलो होतो. काही वेगळ्या विषयावर चर्चा झाली. परंतु राजकीय चर्चा झाली नाही. मी जरी अजितदादांच्या गटात सामील जरी झालो असलो तरी मागील दोन अडीच वर्षांपासून शरद पवारांशी संबंध तोडले असे काही नाही. आजही मी त्यांना नेता मानतो. मागील दोन वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून आणि वैयक्तिक बोलण्यातून असेल, मी शरद पवार साहेबांचे नाव मी राज्यातील मोठे आणि लोकनेते म्हणून घेत आलो आहे, असेही डॉ. शिंगणे म्हणाले. तसेच, भविष्यातसुद्धा पवार साहेबांचे नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे. मी पवारांचे नेतृत्व मान्य करतो. खर म्हटले तर आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्ष काम करत आलो आहे. जवळपास तीस वर्षे झाले आहे त्यांच्या नेतृत्वात काम करत आहे. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा आहे, याबाबत मी आयुष्यभर ऋणी राहणार आहे, असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले.
राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार का, हे स्पष्ट पणे जरी सांगितले नसले तरी, तसे संकेत मात्र त्यांनी दिले आहेत. मागीलवेळी शरद पवार हे बुलढाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पवारांची भेट घेतली होती. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे डॉ. शिंगणे यांनी अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे. ते आघाडी सरकारमध्ये मंत्रीही होते. त्यांनी बुलढाणा लोकसभा मतदार संघाची निवडणूकही राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती. मात्र त्यात त्यांना निसटता पराभव स्विकारावा लागला होता. जिल्ह्यातील एक ताकदवर नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जर त्यांनी अजित पवारांची साथ सोडली तर तो अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जाणार आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे हे शरद पवार यांच्याकडे परतण्यास इच्छूक आहेत. परंतु, त्यांना पवार साहेबांकडून अद्याप ‘ग्रीन सिग्नल’ मिळत नाही, अशी खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय राजकीय सूत्राने दिली आहे. डॉ. शिंगणे यांनी यापूर्वीदेखील शरद पवार यांच्याबद्दल आदरार्थी विधाने केली असून, त्यांची भेटही घेतली होती. आजदेखील त्यांनी शरद पवारांची वैयक्तिक भेट घेऊन चर्चा केली. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात शरद पवार हे ‘सूत्रे फिरवण्याची’ शक्यता असून, तसे घरातूनच आव्हान पवारांनी डॉ. शिंगणे यांच्यासमोर उभे केलेले आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे सर्व गोपनीय रिपोर्ट आहेत. त्यामुळे डॉ. शिंगणे यांनी सावध भूमिका घेत, पवारांशी सलोख्याचे संबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. शरद पवार यांच्याकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळून डॉ. शिंगणे हे परत शरद पवार गटात जातात, की अजितदादांसोबत कायम राहतात, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
—————–