ChikhaliCrimeHead linesVidharbha

रोहीने धडक दिल्याने अंढेरा फाट्याजवळ भीषण अपघात; असोल्यातील महिला ठार, एक अत्यवस्थ!

– जखमींना चिखली येथे हलविले, वैद्यकीय उपचार सुरू!

मेरा बुद्रूक, ता. चिखली (एकनाथ माळेकर) – तांबोळा येथून असोल्याकडे परत येणार्‍या अ‍ॅपे रिक्षाला वनभागातून भरधाव आलेल्या रोही प्राण्याने धडक दिल्याने भरधाव असलेली ही अ‍ॅपे पलटली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना चिखली येथे हलविण्यात येत असताना, त्यापैकी एका महिलेचा रूग्णवाहिकेत जीव गेला. तर एक महिला अत्यवस्थ आहे. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर चिखली येथे उपचार सुरू आहेत. आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अंढेरा फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. सुज्ञ नागरिकांनी वेळीच धाव घेऊन मदतकार्य केल्याने बळींची संख्या वाढू शकली नाही.

सविस्तर असे, की असोला, ता. चिखली येथील काही महिला व पुरुष हे आपल्या नातेवाईकांच्या नैवेद्यासाठीचा तांबोळा येथे कार्यक्रम आटोपून असोला गावाकडे अ‍ॅपे रिक्षा (क्रमांक एमएच २८ एच २७२३)ने सायंकाळी सहा वाजेदरम्यान परत येत असताना भरधाव अ‍ॅपेला रोही प्राण्याने जोरदार धडक दिली. हा रोही अंढेरा फाट्याजवळ चिखली रोडवर जंगलातून भरधाव पळत आला होता. या भीषण अपघातात अ‍ॅपेचा चक्काचूर झाला असून, त्यामध्ये बसलेले महिला व पुरुष प्रवासी हे चालकासह आदळले जाऊन सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. अ‍ॅपे अर्धवट पलटी झाल्याने त्यामध्ये लताबाई सुनील चव्हाण (वय ३२) राहणार असोला बुद्रूक यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नजीकच्या रूग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत गंभीर जखमी जिजाबाई देविदास चव्हाण व चालक बाळू भास्कर सुर्वे यांच्यासह इतर प्रवासी हे गंभीर जखमी झाले असून, औंढेश्वर पतसंस्था व नरेंद्र महाराज यांच्या संस्थेची रूग्णवाहिका अशा दोन रूग्णवाहिकेतून त्यांना तातडीने चिखली येथील रूग्णालयात हलवण्यात आले आहे. ठेकेदार पद्माकर दंडे यांनीसुद्धा आपल्या मालवाहतूक कॅम्पमध्ये एका जखमी महिलेला दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी मदत केली. काही जखमी खाजगी रुग्णालयात चिखली या ठिकाणी उपचार घेत आहेत. त्यातील एक महिल गंभीर जखमी असल्याची माहिती हाती आली आहे.
या दुर्देवी अपघाताची माहिती मिळताच चिखलीकडे जाणारे दत्तकृपा स्टोन क्रेशरचे मालक पद्माकरशेठ दंडे व संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे शिवानंद मान्टे, विष्णू वाघ पिंपरी व विशाल तेजनकर, रवींद्र सानप, अ‍ॅपे संघटनेचे सुशील इंगळे, बंडू राठोड यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदतकार्य केले. शिक्षक मान्टे यांनी तातडीने रूग्णवाहिका बोलावल्या त्यामुळे जखमींना चिखलीला लगेचच हलवण्यात मदत झाली. रोही प्राण्याने जबरदस्त धडक दिल्याने या अ‍ॅपेचा चक्काचूर झाला असून, घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात या महिला पडल्या होत्या. मात्र मदतीला धावून आलेल्या नागरिकांनी वेळीच मदत केल्यामुळे लवकर उपचार मिळाल, हे विशेष. वन विभागाने या मार्गावरील आपल्या हद्दीमध्ये प्राण्याचे फोटो लावून सूचनाफलक निर्माण करून लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याप्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!