– शिवसेना, काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्री शिंदेंसह आ. गायकवाड यांच्यावर हा ‘सत्तेचा माज’ असल्याची जोरदार टीका
– आ. गायकवाडांकडून मात्र कृत्याचे समर्थन; म्हणे, तलवारीने केक कापने गुन्हा नाही!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या लाडक्या चिरंजिवाचा वाढदिवस साजरा करताना चक्क कायदा हातात घेऊन धारदार तलवारीने सार्वजनिकरित्या केक कापला. स्थानिक जयस्तंभ चौकात मृत्युंजय गायकवाड याचा वाढदिवस साजरा करताना हा प्रकार घडला. या घटनेची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, राज्यातील विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. अनेक तरूण तलवारीने केक कापतानाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस त्यांच्यावर कारवाई करतात. येथे सत्ताधारी पक्षाचा आमदार तशाप्रकारे केक कापत असतानादेखील याप्रकरणी पोलिसांनी अद्याप तरी काहीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, या घटनेचे आ. गायकवाड यांनी मात्र समर्थन केले आहे.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापून आपल्या पत्नी व मुलाला भरवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. ठाकरे गटाने त्यांच्या या कृतीवर आक्षेप घेत, त्यांचा उल्लेख मस्तवाल आमदार म्हणून केला आहे. ज्या राज्यात स्वतः गृहमंत्रीच ठोकून काढण्याची भाषा करतात, त्या राज्यात आमदाराने हा माज दाखवणे स्वाभाविकच आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. तर, तलवारीचा वापर कोणाला मारण्याकरिता किंवा हल्ला करण्याकरिता केला नाही, असे समर्थन आ. गायकवाड यांनी केले आहे. ऑलिम्पिकमधील तलवारबाजीदेखील आपल्याला बंद करावी लागेल, असे अजब वक्तव्य करत, त्यांनी आपल्या कृत्याचे जोरदार समर्थन केले. जयस्तंभ चौकातील काल रात्रीच्या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने केक कापत, त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्षा पूजा गायकवाड यांना तो तलवारीनेच भरविला. यानंतर उपस्थित इतर सोयर्यांना तलवारीनेच केक भरवून त्यांचे तोंड गोड केले. त्या अगोदर मृत्युंजय गायकवाड यांचे जाहीर औक्षण करण्यात आले.
तलवारीने केक कापल्यास अनेक व्यक्तींवर आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल होतो. अलीकडच्या काळात मोताळा, देऊळगावराजा, मेहकर तालुक्यात असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी गायकवाड यांचा उल्लेख मस्तवाल आमदार म्हणून केला. ज्या राज्यामध्ये सत्ताधार्यांचे आमदार रोज पोलिसांना नव्या नव्या धमक्या देतात, ज्या राज्यात स्वतः गृहमंत्रीच ठोकून काढण्याची भाषा करतात, ज्या राज्यात मुख्यमंत्रीच दंगलीस कारणीभूत असणार्या व्यक्तीच्या पाठीशी मी ठामपणे उभे राहतात, त्या राज्यात आमदाराने हा माज दाखवणे स्वाभाविक आहे, असे टीकास्त्र सुषमा अंधारे यांनी डागले आहे.
सत्तेचा माज काय असतो याचे प्रदर्शन शिंदे गटातील आमदार वारंवार करत असतात. आमदार संजय गायकवाड यांनी आता तलवारीने केक कापला, इतकंच नाही तर तलवारीने आपल्या पत्नीला, मुलांना केक भरवला. महाराष्ट्रासाठी तलवार हे शौर्याचे प्रतीक आहे. तलवार स्वराज्याच्या लढ्यात होती, महाराष्ट्राच्या शत्रूंवर वार करण्यासाठी होती. आणि शिंदे गटातील आमदार तलवारीचा वापर केक कापायला करतात. नियमानुसार तलवारीचे असे प्रदर्शन आणि वापर करता येत नाही. पण आपल्या पाठिंब्याने बनलेले मुख्यमंत्री राज्यात असल्यामुळे वाटेल तो माज करायला आणि मिरवायला शिंदे गटाच्या आमदारांना सुट मिळालेली आहे. अशा शब्दात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे.