चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील इसरुळ येथील विद्यमान सरपंच तथा चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील भुतेकर हे मागील दोन वर्षांपासून दि. १२ ऑगस्ट या दिवशी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त वृक्ष लागवड करत आहेत. यावर्षी त्यांनी स्वखर्चातून इसरुळ गावामध्ये जांभूळ, आंबा, लिंब, नारळ, फणस, अशोक, मोहगणी अशा देशी ४०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षतोड झाल्यामुळे गेल्या काही वर्षापासून तापमानात वाढ होत आहे. तसेच निसर्गचक्र बिघडत चालले आहे. त्यासाठी शासन विविध माध्यमातून पर्यावरण जागृती अभियान राबवीत आहे. पर्यावरण संतुलित राहण्यासाठी झाडे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत म्हणून तर नुकताच शासनाने वृक्षतोड करणार्या व्यक्तीस ५० हजार रुपयेपर्यंत दंड आकारण्याचा जी.आर. काढला गेला आहे. सरपंच सतीश पाटील यांनी आपले विचार मांडताना सांगितले, की वृक्षांची संख्या जितके जास्त होईल, तितकीच हिरवळ वाढेल आणि आपले पर्यावरण प्रदूषण मुक्त होईल. तसेच वृक्ष लागवड करताना त्या वृक्षांचे महत्त्व व त्यांचे गुण लक्षात घेऊन अनेक वर्षे टिकणार्या आणि सर्वांना खाता येईल अशाच फळ देणार्या देशी झाडांची निवड केली असल्याचे सांगितले. दोन वर्षापूर्वी जि.प. शाळेमध्ये लावलेले छोटेसे रोपटे आज मोठे वृक्ष झाल्याचे पाहून त्यासोबत शाळेतील शिक्षक व मुलांसोबत फोटो काढत समाधान व्यक्त केले.
यावेळी इसरुळ ग्रामपंचायतीचे सचिव, माजी उपसरपंच कलीम शेख, सदस्य भिकनराव भुतेकर, अमोल भुतेकर, सुभाष खरात, रंगनाथ पाटील, संजय नाडे, शेख रज्जाक, किसन आण्णा, रामेश्वर भुतेकर, शेख मोबीन, गोविंद वगदे, नंदू पुंगळे, चंद्रकांत भुतेकर, पुंजाराम भुतेकर, शेख हमीद, मैनुभाई, मुख्तार शेख, रमेश पेंटर, बंडू नाडे, सुरेश नाडे, विजय नाडे, महादू काकडे, बाबुराव नाडे अशा अनेक गावकर्यांच्यासह जि.प.मुख्याध्यापक बंगाळे सर, व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा, कलंदर बाबा दर्गा, अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, खंडोबा मंदिर परिसर, मस्जिद परिसर येथे वृक्ष लागवड करण्यात आले. तसेच शादीखाना येथे शौचालय बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. सरपंच सतिश पाटील भुतेकर यांच्या या वृत्तीतून त्यांचे निसर्गा प्रती असलेले प्रेम दिसून येते. वाढदिवसावर इतरत्र खर्च न करता वृक्ष लागवड करून त्यांनी समाजाला एक प्रकारचा संदेश दिला.