▪️ दाणे यांच्या जागी वसंतराव भोजने जिल्हाप्रमुख
(देशोन्नती जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून प्रतापराव जाधव यांची हकालपट्टी करण्यात आल्याची पत्रक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून प्रसिद्धीस देण्यात आले आहे. तर मलकापूर व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी नेमलेले शांताराम दाणे पाटील यांनाही जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्यात येऊन, त्यांच्या जागी वसंतराव भोजने यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
यासह राजू मिरगे व संजय अवताडे यांनाही उपजिल्हाप्रमुख पदावरून काढून टाकण्यात आले आहे, तर नांदुऱ्याचे तालुकाप्रमुख संतोष डिवरे, मलकापूरचे तालुकाप्रमुख विजय साठे, व शेगावचे तालुकाप्रमुख रामा थारकर यांनाही तालुकाप्रमुख पदावरून हटविण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून ‘सामना’द्वारे प्रकाशित पत्रकातून कळविण्यात आले आहे.
बुलडाणा जिल्हा परिषद निवडणुकीत प्रतापराव जाधव यांचे पुत्र ऋषिकेश जाधव यांना पराभवाचा धक्का बसला होता. जिल्हा शिवसेनेत प्रतापराव जाधव यांचा शब्द अंतिम समजला जात होता. संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यांच्या दोन विश्वासू आमदारांपाठोपाठ खासदार जाधवही शिंदे यांच्या तंबूत दाखल झाले आहेत. केंद्र सरकार स्तरावरील मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागण्यासाठी व पुत्र ऋषिकेश व स्वत:चे राजकीय भवितव्य लक्षात घेता प्रतापराव जाधवांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. प्रतापराव जाधवांच्या निर्णयाचा बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार असून जिल्हा शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.