– देवेंद्र फडणवीसांसह उद्या घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोनच आठवड्यात तब्बल पाचव्यांदा दिल्लीवारी करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ते उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. याभेटीत राज्यातील राजकीय घडामोडी, सर्वोच्च न्यायालयातील खटला, निवडणूक आयोगाकडील याचिका व मंत्रिमंडळ विस्तार याबाबत चर्चा होऊ शकते, असे राजकीय सूत्राने सांगितले. एकच आमदार असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही सत्तेत सहभागी करून घ्यावे, असा शिंदे गटाचा आग्रह आहे. तसेच, शिंदे गटाला केंद्रातही मंत्रिपद हवे आहे, याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होऊ शकते, असेही सूत्र म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वीच दिल्लीला गेले होते. परंतु, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली नव्हती. आता शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांना भेटीला बोलावण्यात आले आहे. फडणवीस हे दिल्लीत पोहोचलेले असून, शिंदे हे सायंकाळी दिल्लीकडे निघणार आहेत. भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संवाद साधत आहेत, त्या बैठकीला फडणवीस हजर राहतील तर उद्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शपथ घेणार असल्याने, त्या कार्यक्रमाला शिंदे व फडणवीस हे दोघेही हजर राहतील. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे राजकीय सूत्राने सांगितले आहे.
————
पक्षचिन्हाचा वाद : शिवसेना व शिंदे गटाला निवडणूक आयोगाने मागितले पुरावे!
दरम्यान, शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर शिंदे गटाने दावा सांगितला असून, याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे. तत्पूर्वी पक्ष चिन्हाबाबत शिवसेना आणि शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. शिवसेनेचे आमदार आणि खासदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आपल्याकडे ५० आमदार आणि १२ खासदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहुमत सिद्ध करण्याचे लेखी पुरावे मागितले आहेत. यापूर्वी शिवसेनेच्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने आठवडा-दोन आठवड्यात इतक्यावेळा दिल्लीवारी केली नव्हती. शिंदे यांनी ते रेकॉर्ड मोडले आहे. ही बाब कट्टर शिवसैनिकांना खटकत आहे.
——————–
Leave a Reply