BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

मेहकर विधानसभा मतदारसंघातील बदलते राजकीय वारे सिद्धार्थ खरातांसाठी ठरणार अनुकूल!

– मेहकर विधानसभा मतदारसंघात भेटीगाठीवर दिला जोर; बदललेली राजकीय समिकरणे ठरणार फायद्याची!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून, येथून सद्या शिंदे गटाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर हे पुन्हा मैदानात उतरणार आहेत. तर राज्य सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेले माजी सनदी अधिकारी सिद्धार्थ खरात यांनी या मतदारसंघात गाठीभेटींवर भर दिला असून, या मतदारसंघातील बदललेली राजकीय समिकरणे त्यांना फायद्याची ठरणारी आहेत. आ. रायमुलकर यांना यंदा ‘एंटी इनकम्बेंसी’चा फटका बसण्याची शक्यता असून, कट्टर शिवसैनिकांच्या निशाण्यावरही ते आहेत. तसेच, लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहाता, त्यांची सीट पहिल्यांदाच धोक्यात सापडलेली आहे. त्यामुळे राजकीय चाचपणी घेणार्‍या सिद्धार्थ खरात यांना त्यांच्या बहुतांश निकटवर्तीयांनी या मतदारसंघातून लढण्याचा सल्ला दिला असून, ते हा सल्ला कितपत अमलात आणतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खरात हे मैदानात उतरले तर शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारेचा नेता पहिल्यांदाच या मतदारसंघातून उभा राहणार असून, पुरोगामी विचारधारेचा हा मतदारसंघ त्यांना अव्हेरणार नाही, याची खात्री बहुतांश सर्वांनीच व्यक्त केलेली आहे.
advt.

प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले व नुकतीच सेवानिवृत्ती घेतलेले, सामाजिक सेवेचा वसा अंगी ठासून भरलेले जेष्ठ सेवानिवृत्त सनदी अधिकारी सिध्दार्थ खरात हे जनसेवेचा वसा कायम तेवत ठेवण्यासाठी आता राजकीय आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा असून, याचीच सुरुवात म्हणूनच की काय, त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय चाचपणीदेखील सुरू केली आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष भेटीगाठीवर त्यांनी चांगलाच जोर दिल्याचे दिसून येत आहे. आणि, विशेष म्हणजे, त्यांना लोकांतून जोरदार प्रतिसाददेखील मिळत आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघ तसा काँग्रेसचा गड. यापूर्वी येथून जानेफळचे वानखेडे, अ‍ॅड. कंकाळ, स्व. आनंदराव देशमुख, अण्णासाहेब सांगळे, अण्णासाहेब देशमुख, भाऊसाहेब लोंढे, सुबोध सावजी हे आमदार राहिल्याचा इतिहास आहे. यातील बहुतांश आमदार काँग्रेसचे होते. १९९५ मध्ये शिवसेनेचे प्रतापराव जाधव निवडून आल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. तर मेहकर विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर गेल्या पंधरा वर्षांपासून येथे शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर आमदार आहेत. परंतु ते शिंदे सेनेत गेल्याने कट्टर शिवसैनिक त्यांच्यावर दात खाऊन आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळेच की काय, खा.प्रतापराव जाधव यांना होम ग्राऊंड व शिवसेनेचा गड म्हटल्या जाणार्‍या मेहकर विधानसभा मतदारसंघातच अवघ्या २७३ मतांचा निसटता लीड मिळाला असून, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार प्रा. खेडेकर यांना येथे ५५ हजाराच्या आसपास मते मिळाली आहेत. यावरून आता मेहकर विधानसभेची राजकीय परिस्थिती बदलल्याचे जाणकारांचे म्हणणे असून, सदर परिस्थिती प्रशासनाचा गाढा अनुभव असलेले व नुकतीच सेवानिवृत्ती घेतलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सिध्दार्थ खरात यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अनुकूल आहे.
तसेही सिद्धार्थ खरात यांचे विविध सामाजिक उपक्रम गेल्या चार ते पाच वर्षांपासून मेहकरात सुरू असून, अनेक कार्यक्रमांना त्यांनी वेळोवेळी हजेरीदेखील लावली आहे. मंत्रालयीन विविध जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या, शिवाय या माध्यमातून ते अनेकांच्या कामीदेखील पडल्याने हीसुध्दा त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. राजकीय चाचपणी म्हणून गेल्या बरेच दिवसांपासून ते मेहकर मतदारसंघात फिरून शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतरही नेते व कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटत असून, त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. प्रशासकीय अनुभव, मधुरवाणी अन् तोलून मापून बोलणे, त्यामुळे भेटणार्‍या प्रत्येक माणसाला ते आपलेसे वाटतात. राजमाता जिजाऊंचे संस्कार अंगी बाळगणारे, शिव-शाहू-फुले-आंबेडकर व तुकोबांच्या वारकरी परंपरेचे पाईक असलेले सिध्दार्थ खरात यांचा आज, १५ ऑगस्टरोजी स्वातंत्र्यदिनी वाढदिवस, त्यांच्या पुढील राजकीय इनिंगला ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या शुभेच्छा!


Imageअवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत मेहकर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात सरळ सरळ लढत होणार आहे. त्यातच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची महाराष्ट्र क्रांती आघाडीदेखील मैदानात उतरणार आहे. मेहकरची जागा महायुतीत शिंदे गटाकडे असून, येथून विद्यमान आमदार डॉ. संजय रायमुलकर यांना उमेदवारी निश्चित आहे. तर महाआघाडीकडून ही जागा शिवसेना (ठाकरे) यांना सुटणार असून, सद्या उद्धव ठाकरे यांच्याकडे येथे सक्षम उमेदवार नाही. या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व आहे. सिंदखेडराजाची जागा ठाकरेंना देऊन मेहकरची जागा स्वतःकडे घेण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. परंतु, काँग्रेसकडेही आ. रायमुलकरांच्या तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे सिद्धार्थ खरात यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी मिळेल, असे संवâेत आहेत. शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी उमेदवारी दिली नाही तर खरात व तुपकर हे चांगले मित्र आहेत. तसेच, दोघांची वैचारिक विचारधाराही एक आहे. आणि, विशेष म्हणजे, डॉ. रायमुलकर यांना पराभूत करणे हेच तुपकर, शिवसेना व काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सिद्धार्थ खरात यांना महाराष्ट्र क्रांती आघाडीकडूनही संधी मिळाली तर हा धडाकेबाज माजी सनदी अधिकारी विधानसभा गाठू शकतो, असा राजकीय धुरिणांचा अंदाज आहे. कट्टर शिवसैनिक, काँग्रेसचे केडर कार्यकर्ते, रायमुलकर यांच्या मध्यंतरी व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह विधानानंतर नाराज झालेला दलित समाज, या सर्वांची मते सिद्धार्थ खरात यांच्या झोळीत पडू शकतात, असा अंदाजही या भागातील राजकीय कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. सद्या आ. रायमुलकर हे विकासकामांवर बोलत आहेत. तर सिद्धार्थ खरात हेदेखील विकासाचे रोल मॉडेल मांडत आहेत. दोघांचाही राजकीय प्रचार सकारात्मक असला तरी, उद्या निवडणूक मैदानात नेमके कोणते मुद्दे पुढे येतील, यावर निवडणुकीचा कौल अवलंबून असणार आहे.
———–

माजी सनदी अधिकारी सिद्धार्थ खरात हे फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेचे पाईक आहेत, तसेच ते वारकरी संप्रादयाशीदेखील निगडीत आहेत. त्यांच्यासारखा अभ्यासू, जाणकार आणि सर्व समाज, जातींना सोबत घेऊन राजकारण करणारा वैचारिक नेता विधानसभेत जाणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या गाठीभेटी सुरू असल्या, आणि जनमत आणि राजकीय वातावरणही त्यांना अनुकूल असले तरी, त्यांनी सोशल मीडियावर भर देणे गरजेचे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह व्हा, लोकांपर्यंत तुमच्या भूमिका पोहोचवा, उपेक्षित आणि पिचलेल्या समाज घटकांसह मोठ्या जातसमूहांत आश्वासकता निर्माण करा, असा सल्लाही त्यांना अनेक ज्येष्ठ राजकीय धुरिणांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!