SINDKHEDRAJAVidharbha

शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार!

– शिक्षक संघटनांच्यावतीने नूतन गटशिक्षणाधिकार्‍यांचे स्वागत

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्यावतीने सिंदखेडराजा पंचायत समितीचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी भास्करराव वाघमारे यांचा काल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या बैठकीत दिले. शैक्षणिक कामे करीत असताना शिक्षकांना ऑनलाईन कामामुळे प्रचंड ताण सहन करावा लागत असल्याची बाब गटशिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आणून देण्यात आली. उठसूठ अशैक्षणिक कामामुळे अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावित होत आहे. प्रत्येक शाळेवर शिक्षक संख्या कमी आहे. अनेक शिक्षकांना जादा प्रभार देण्यात आला आहे. त्याचा ताण इतर शिक्षकांवर पडत आहे, अशा अडचणीही यावेळी गटशिक्षणाधिकार्‍यांच्या कानावर यावेळी घालण्यात आल्यात.

अलीकडच्या काळात सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये नोकरीमध्ये फायदे मिळविण्यासाठी अनेक शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र घेतलेले आहेत. त्यामुळे खरे दिव्यांग बांधव आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे शिक्षक अन्याय होत आहे. खरे दिव्यांंग कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचीही चौकशी करणे गरजेचे आहे. संचमान्यतेसाठी मुख्याध्यापकांना वारंवार पंचायत समितीमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. अनेक शाळांवर मोबाईल रेंज नाही. त्यामुळे ऑनलाईन माहिती भरताना अडचणी येत आहेत. त्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे. ही बाबही या बैठकीत गटशिक्षणाधिकारी वाघमारे यांच्या लक्षात आणून देण्यात आली. त्याचप्रमाणे नुकतेच समग्र शिक्षण अभियानचे किरण वहिले यांचे एका अपघातामध्ये दुःखद निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह निधी उपलब्ध व्हावा, यासाठी स्वेच्छेने निधी गोळा करुन त्यांच्या परिवाराला देण्यात यावा. यासाठी नियोजन करण्यात आले. याप्रसंगी सिंदखेडराजा तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष तेजराव देशमुख, अपग्रेड मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष सरकटे , दिव्यांग शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर गारोळे, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष कैलास ढोलेकर , कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष सोनोने, उर्दू शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष रफिक खान, केंद्रप्रमुख अरुण खेडेकर, उच्चश्रेणी मुख्याध्यापक संजय जाधव, भाग्यवान झोरे, शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक लिंबाजी तायडे, कार्यकारी संचालक शेख तसलीम, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे शरद नागरे, नितीन मोरे, रमेश बेंदाडे, याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी गटशिक्षणाधिकारी भास्करराव वाघमारे यांचा शाल व पुष्पहार घालून मानसन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!