चिखली (महेंद्र हिवाळे) – कत्तलीसाठी नेण्यात येणार्या गोधनाला वाचविण्यात चिखली पोलिसांना यश आले आहे. ही जनावरे एका आयशर ट्रकमधून निर्दयीतेने कोंबून नेण्यात येत होती. चिखली-देऊळगावराजा मार्गावरील शुभम फर्निचरसमोर पेट्रोलिंग करणार्या पोलिसांच्या पथकाने संशयावरून हा ट्रक अडविला आणि तब्बल १६ बैलांना जीवदान मिळाले. या कारवाईने पशुप्रेमींनी चिखली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.
सविस्तर असे, की चिखली-देऊळगावराजा मार्गावरील शुभम फर्निचर दुकानासमोर चिखली पोलीस पेट्रोलिंग करीत असताना एक आयशर क्रमांक एम एच-२०-जीसी-८६२८त्यामध्ये गोवंश वाहतूक होताना दिसून आली. या वाहनाला थांबवून वाहनाची पाहणी केली असता, या वाहनात एकूण १६ बैलांपैकी काळ्या पांढर्या रंगाची तीन, लाल रंगाचे चार, पांढरे रंगाचे नऊ असलेले बैल प्रत्येकी किमती अंदाजे २५ हजार रुपये एकूण चार लाख असे एकूण ११ लाख रुपये खरेदी करून त्यांना उभे राहण्यास व बसण्यास जागा नसतानाही निर्दयतेने दोन्ही फाळक्यांना त्यांचे तोंड दोरीने बांधून कत्तल करण्याचे उद्देशाने मिळून आले. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये ११/१(ड),(इ),(एफ) प्राण्यांचा छळ अधिनियम १९६०सह कलम ५अ,९,११ महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमाह कलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच आरोपी रमजान शेख मोहम्मद शरीफ वय २६ वर्ष रा. बोरगाव सरवणी ता. सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर, शेख करीम शेख समद वय ४३ वर्ष राहणार पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर, शेख अखिल शेख खलील व २५वर्ष रा वंगारी ता. जामनेर जिल्हा जळगाव खान्देश यांना अटक करण्यात आलेले आहे. पुढील तपास चिखली पोलिस करत आहेत.