– प्रदेश प्रभारी चेन्नीथल्ला, प्रदेश अध्यक्ष पटोले, खा.वासनिक, थोरात, वडेट्टीवारसह दिग्गज राहणार उपस्थित!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून, सर्वच राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने तयारी चालवली आहे. काँग्रेसही कामाला लागल्याचे दिसत आहे. काँग्रेसने सर्वच मतदारसंघातून इच्छुकांचे अर्जदेखील मागितले आहेत. याचदृष्टीने विधानसभा निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.१३) येथील सहकार विद्या मंदिर सभागृहात वाशिम, अकोला व बुलढाणा अशा जिल्ह्यानिहाय बैठका झडणार आहेत. काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, अ.भा. महासचिव तथा जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.मुकूल वासनिक, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारसह दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.? काँग्रेसनेही विभागवार बैठकांचा धडाका लावला असून, यामाध्यमातून विधानसभा निवडणूक मतदारसंघनिहाय पूर्वतयारीचा आढावा घेतला जात आहे. मंगळवारी येथील सहकार विद्या मंदिर सभागृहातदेखील वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, अखील भारतीय काँग्रेस महासचिव तथा जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.मुकूल वासनिक, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद गटनेते सतेज पाटीलसह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान बुलढाणा, अकोला व वाशिम जिल्हा काँग्रेस ची एकत्रित बैठक पार पडणार आहे. दुपारी २ ते ३ वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी, ३ ते ४ वाजे दरम्यान अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी तर सायंकाळी ४ ते ५ दरम्यान बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीची स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे. सदर बैठकीस आजी, माजी खासदार, आमदार, जि.प. पं.स. पदाधिकारी, जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, विविध आघाड्या व सेलचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले आहे. असे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सतिष मेहेंद्रे, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख श्लोकानंद डांगे यांनी कळविले आहे.