मुंबई (प्रतिनिधी) – मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार तथा ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज (दि.१०) पहाटे मुंबईत कर्करोगाने निधन झाले. ते गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते आणि त्यांनी त्यावर मात केली होती, मात्र त्यांचा रोग पुन्हा बळावला, त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईतील अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दु:खद बातमीनंतर मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
अभिनेते विजय कदम १९८० आणि ९० च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते. त्यांना अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात असे, त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या. गेल्या दीड वर्षांपासून ते कॅन्सरने त्रस्त होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षांचे होते. पत्नी आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. गत जानेवारी महिन्यात त्यांची अचानक प्रकृती बिघडली. तेव्हापासून ती बिघडतच गेली. आणि अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. विजय कदम गंभीर आजारी असल्याचे वृत्त समोर येताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. आपला लाडका अभिनेता या भयंकर आजारातून बरा व्हावा अशी प्रार्थना ते करत होते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत विजय कदम यांनी त्यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नी व मुलाने त्यांना खंबीर साथ दिली, असे सांगितले होते. त्यांच्यावर ४ किमोथेरेपी आणि २ सर्जरी झाल्या होत्या. विजय कदम हे त्यांच्या विनोदी पात्रांमुळे अधिक लक्षात राहिले. त्यांची अनेक नाटकं रंगभूमीवर गाजली. विशेषतः विच्छा माझी पुरी करा, रथचक्र, व टूर टूर ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. त्यांनी चित्रपट क्षेत्रावरही स्वत:ची पकड मजबूत ठेवली होती. चष्मेबहाद्दर, पोलिसलाईन, हळद रुसली कुंकू हसलं आणि आम्ही दोघं राजा राणी या सारख्या चित्रपटांत त्यांनी अभियनाची छाप उमटवली.