– भारताचे बांगलादेशातील परिस्थितीवर लक्ष, सर्वपक्षीय बैठकीत रणनीती निश्चित, शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्करी कारवाईची शक्यता?
– बांगलादेशात हिंदूंच्या घरांची लुटालूट, नृशंस कत्तली, हिंसाचारात हजारो ठार!
ढाका/नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – बांगलादेशात पुन्हा एकदा गृहकलह भडकला असून, पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्यासाठी सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. चोहीकडे हिंसाचार सुरू झाल्यानंतर पोलिस गायब झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगला लष्कराने कंबर कसली होती. दरम्यान, शेख हसिना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत, सुरक्षितपणे भारत गाठले. त्या भारत किंवा ब्रिटनमध्ये राजकीय शरण घेण्याची शक्यता आहे. यापूर्वीदेखील शेख हसिना यांच्यासह त्यांच्या वडिलांना भारताने सुरक्षित राजकीय शरण दिली होती. दरम्यान, बांगलादेशात हिंदूंची लुटालूट व कत्तली सुरू झाल्या होत्या. देशात हिंसाचार भडकल्याने भारत तीव्र चिंतेत पडला असून, आज केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन रणनीती आखली. गरज पडल्यास भारतीय सैन्य बांगलादेशाच्या भूमीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी उतरू शकते. विदेशमंत्री जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
बांगलादेशातून भारतात सुरक्षितपणे आणल्या गेलेल्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना गाजीयाबाद विमानतळावरून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे स्वतः विमानतळावर हजर होते. बांगलादेशी लष्कराच्या विशेष विमानाने त्यांना भारतात सोडले. शेख हसिना यांच्या राजीनाम्यासाठी मोठा हिंसाचार सुरू झाल्यानंतर परिस्थिती आटोक्याबाहेर जाताच शेख हसिना यांनी आपला राजीनामा दिला. सद्या ढाका शहरासह देशातील अनेक भागात जोरदार हिंसाचार सुरू असून, हिंदूंच्या घरांची लुटालूट सुरू होती. हजारो लोकांचे बळी गेले आहेत.
शेख हसिना यांची सत्ता उलथावून लावण्याची प्रमुख कारणे.
– निवडणुकीत बेईमानी केली, मीडिया ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला.
– विरोधी पक्षाच्या नेत्यांवर छापेमारी, त्यांना तुरूंगात डांबले.
– वाढती बेरोजगारी, वाढती महागाई रोखण्यात अपयश
– पोलिसराज आणण्याचा प्रयत्न केला. जनतेवर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी लोकं घुसले असून, त्यांनी पंतप्रधान निवासाचा ताबा घेतला आहे. बांगलादेशाचे लष्करप्रमुख वकर-उज-जमान यांनी देशाला संबोधित करत शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, तातडीने तात्पुरते सरकार स्थापन करण्याचेही आश्वासन दिलेले आहे. अनेक मोठ्या शहरात सद्या संचारबंदी लागू केली असून, दिसताक्षणी लष्करी जवान गोळ्या घालत आहेत. दरम्यान, विदेशमंत्री जयशंकर यांनी संसदेत सांगितले, की आम्ही ढाका प्रशासनाच्या संपर्कात असून, राजदूत व हिंदूंच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊले उचलण्याची विनंती केलेली आहे. जयशंकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांनादेखील संबोधित करताना सांगितले, की बांगलादेशातील परिस्थिती गंभीर असली तरी काळजी करण्यासारखी नाही. १२ ते १३ हजार भारतीयांना तेथून सुरक्षित बाहेर काढावे लागेल.
शेख हसिना यांच्या राजीनाम्यानंतर हसिना सरकार कोसळले असून, बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी (बीएनपी)ने राष्ट्रपती शहाबुद्दीन यांना तातडीने संसद बरखास्त करून अंतरिम सरकार गठीत करण्याची मागणी केली आहे. तसेच, हसिना सरकारच्या काळात विरोधकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, राजकीय विरोधकांना कारागृहातून सोडण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बांगलादेशात लवकरच निवडणुका होण्याची शक्यता आहे.
———–