काकाने थांबावं, मला पाठिंबा द्यावा – गायत्री शिंगणे
– मंत्रीपदाच्या तुलनेत मतदारसंघाचा विकास झाला नाही, लोकं नाराज आहेत!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – विधानसभा निवडणूक लढविणार असून, डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आता थांबले पाहिजेत, व मला पाठिंबा दिला पाहिजेत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गायत्री शिंगणे यांनी मांडली. शेतकरीहित व विविध मागण्यांसाठी त्यांनी सिंदखेडराजा येथे विराट मोर्चा काढला होता. त्यानंतर त्या आज प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघात एमआयडीसी नाही, कॉलेजेस नाहीत, रोजगार, नोकरीच्या संधी नाहीत. गेल्या २५ वर्षांत काहीही विकास झाला नाही, मंत्रीपदाच्या काळात विकास करता आला असता, पण तोही झाला नाही. त्यामुळे लोकं नाराज आहेत. तेव्हा काकांनी आता थांबले पाहिजे व मला आशीर्वाद दिला पाहिजेत, अशी भूमिकाही गायत्रीताई यांनी यावेळी मांडली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, की डॉ. राजेंद्र शिंगणे हे अजितदादांच्या गटात असून, दादांनी फोर्स केला, तर डॉ. शिंगणे हे निवडणुकीला उभे राहतील. पण, डॉ. शिंगणे यांनी माघार घेतली तर ती माझ्यासाठी चांगली गोष्ट राहील. त्यांनी माघार घेऊन मला पाठिंबा द्यावा. तथापि, याबाबत आमचे अजून काहीच बोलणे झालेले नाही. काही झाले तरी मी सिंदखेडराजा मतदारसंघातून मी शंभर टक्के निवडणूक लढवणार आहे. मतदारसंघात समस्या भरपूर आहेत. शेतकर्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. पण आपल्या हातात असूनही आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही, याची आम्हाला खंत आहे. मागील मोर्चाच्या वेळी आम्ही त्यांना (डॉ. राजेंद्र शिंगणे) शेतकर्यांच्या मदतीसाठी विनंती केली होती. लोकांना पीकविमा, गारपीठीच्या नुकसानीचे पैसे मिळालेले नाहीत. परंतु, त्यांनी शेतकर्यांना मदत केली नाही. या मतदारसंघाचा चाळीस ते पन्नास टक्के विकास झालेला आहे, असे आपण म्हणू शकतो. परंतु, राजेंद्र शिंंगणे यांना मिळालेल्या मंत्रिपदाच्या तुलनेत मतदारसंघाचा विकास झालेला नाही. साहेबांना मिळालेली खाती पाहता, लोकांच्या अपेक्षा मोठ्या होत्या. आमच्या मतदारसंघात एमआयडीसी नाही, महाविद्यालये नाहीत. तरुणांना शिकायला आणि नोकरीसाठी बाहेरगावी जावे लागत आहे, याची मोठी खंत वाटते. हे प्रश्न सोडवायचे असतील, शेतकर्यांसाठी काम उभे करायचे असेल तर विधानसभेत पोहोचणे गरजेचे आहे. मतदारसंघातील सुतगिरणी आणि साखर कारखाना माझे आजोबा भास्करराव शिंगणे यांनी चालू केला होता. आमची सर्वांची हीच इच्छा होती की, त्या संस्था हातातून जाऊ द्यायला नको होत्या. या दोन्ही संस्था बंद पडल्यामुळे मतदारसंघातील रोजगार कमी झाला आहे. शरद पवार यांनी मला संधी दिली तर मी त्या संधीचे सोने करेन. या दोन्ही संस्था मला सुरू करायाच्या आहेत. सिंदखेडराजा मतदारसंघातील पन्नास ते साठ टक्के जनता माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे. मतदारसंघातील लोकांना नवा चेहरा आणि नवे नेतृत्व हवे आहे. मी उद्या निवडून जरी आले तरी २५ वर्षांची कसर पाच वर्षांत तर भरून काढू शकणार नाही. पण आम्ही प्लॅन केल्याप्रमाणे काम करत राहणार आहे, आणि विकासाच्या प्रगतीपथावर या मतदारसंघाला नेणार आहोत, असेही गायत्री शिंगणे यांनी सांगितले.
————–
सिंदखेडराजा येथे विराट मोर्चा काढून गायत्री शिंगणे यांनी आपले शक्तिप्रदर्शन केले. त्यांनी एकप्रकारे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात विधानसभेसाठी रणशिंगच फुंकले असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.