वादग्रस्त पूजा खेडकरचा ‘गेम ओव्हर’; कोणत्याहीक्षणी अटकेची शक्यता!
– मोबाईल स्वीचऑफ करून बसेलली पूजा खेडेकर नेमके आहे तरी कुठे?; पोलिसांकडून शोध सुरू!
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात चर्चेत आलेल्या माजी व वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचा ‘गेम ओव्हर’ झाल्यात जमा आहे. तिच्याविरोधात केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)ने फसवणूक व बोगसगिरी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांत गुन्हे दाखल केल्यानंतर तिने दिल्लीच्या पतियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण हा अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर हिला कोणत्याहीक्षणी अटकेची शक्यता आहे. तथापि, आपला मोबाईल स्वीचऑफ करून अज्ञात ठिकाणी दडून बसलेली पूजा खेडकर कुठे आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, पूजा या निकालाविरोधात पुन्हा वरच्या कोर्टात अपील करणार की नाही? याविषयी निश्चित माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पूजाने बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रâॉड केल्याबद्दल केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी पूजा खेडकरने दिल्लीच्या पतियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने तिचा जामीनअर्ज फेटाळून लावला व पोलिसांना शरण जाण्याचे निर्देश दिले. बुधवारी कोर्टात याबाबतची सुनावणी झाली तेव्हा तिच्या वकिलांनी असे काही युक्तिवाद केले की, या केसला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली. पूजा खेडकर प्रâॉड नाही, तर फायटर आहे, असा दावा तिचे वकील अॅड. माधवन यांनी केला. पूजा खेडकर ही एकापेक्षा अधिक अपंगत्व असलेली उमेदवार आहे. ती ४७ टक्के अपंग आहे. एम्सच्या आठ डॉक्टरांच्या बोर्डाने अपंगत्व प्रमाणपत्र दिलंय. यात प्रâॉड कुठे आहे? असा सवाल तिच्या वकिलांनी केला. पूजा खेडकर किंवा तिच्या आईवडिलांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. नाव बदलल्यानंतर प्रत्येकवेळी ते गॅझेटमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे, दावाही वकिलांनी केला. तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता, असा दावाही या वकिलांनी केला. दरम्यान, कोर्टात झालेल्या सुनावणीत दिल्ली पोलीस व यूपीएससी यांच्यावतीनेदेखील जोरदार बाजू मांडण्यात आली. पूजा खेडेकरचे सर्व दावे खोडून काढण्यात आले. तिने कशी फसवणूक केली, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर हिच्याकडून खोटी कागदपत्रे सादर केल्याचा युक्तिवाद केला. तर यूपीएससीने पूजा खेडकर यांनी फक्त आम्हालाच नाही, तर संपूर्ण समाजाला फसवले आहे, असे म्हणत तिच्या अटकेची मागणी केली.
————
निकाल देताना कोर्टाने काय म्हटले?
– ज्यांनी पात्र नसताना चुकीच्या पद्धतीने सूट मिळवली, अशा लोकांचा शोध घेण्यासही कोर्टाने यूपीएससीला सांगितले.
– पूजा खेडकरला यूपीएससीमधील कोणी मदत केली आहे का? याचाही तपास करण्याचे पोलिसांना निर्देश दिले.
– पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळून लावला.
– पूजा खेडकरकडे दिल्ली हायकोर्टात जाण्याचा पर्याय उपलब्ध.
————–
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याचा ठपका पूजा खेडकर यांच्यावर आधी ठेवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. पुढे पूजा खेडकर हिने सनदी सेवेत निवड होताना त्यांच्या दिव्यंगत्वाबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप करण्यात आला. शिवाय, तिच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही तिने ओबीसी क्रिमीलेअर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, यासाठी तिने परीक्षेसाठी अर्ज करताना नावामध्येही वारंवार बदल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी याचबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा उल्लेख न्यायालयातील सुनावणीमध्ये करण्यात आला. याप्रकरणी यूपीएससीने तक्रार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी विविध कलमांअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात पूजाला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पोलिसांनी तीनवेळा समन्सदेखील बजावले होते. पण पूजा खेडकर चौकशीसाठी हजर राहिली नाही. पूजा खेडकरचा फोन नॉट रिचेबल येत आहे. या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून पूजा खेडकरने थेट कोर्टाची पायरी चढली होती. पण आता कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरला कधीही अटक होऊ शकते.
————
मनोरमा खेडकरही अडचणीत!
दरम्यान, पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावरचा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला असून, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट यावर शुक्रवारी म्हणजे २ ऑगस्टला निर्णय देणार आहे. शेतकर्याला धमकावल्याचे हे प्रकरण आहे. सुनावणीवेळी मनोरमा खेडकर यांच्यावर लावलेली सगळी कलम जामीनपात्र असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला. तसेच त्या महिला असून, त्यांचे वय ६० वर्षं आहे. त्या आजारी असतात त्यामुळे त्यांना जमीन देण्यात यावा, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली. यावर सरकारी वकिलांनीही आपली बाजू जोरदारपणे मांडली. मनोरमा खेडकर यांनी सार्वजनिक ठिकाणी पिस्तुल दाखवले. त्यांच्याकडे त्याचा परवाना आहे मात्र त्यालाही काही नियम असतात, याकडे सरकारी वकिलांनी लक्ष वेधले. त्यानी शेतात जाताना हत्यार नेले, त्यातूनच त्यांचा हेतू लक्षात येतो, असे सरकारी वकील म्हणाले. मनोरमा खेडकर यांनी गुंड किंवा बाऊन्सर आणले होते, त्यांनाही ताब्यात घ्यायचे असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. तसेच त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी केली.