– ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील हा खाशाबा जाधव यांच्यानंतर पहिला खेळाडू!
पॅरिस (वृत्तसंस्था) – कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले. ऑलिम्पिकमधील हे भारताचे तिसरे पदक ठरले आहे. स्वप्निलच्या या विजयाने १९५२ नंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले, असून कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर तो पहिला मराठी क्रीडापटू ठरला आहे.
नेमबाजीत स्वप्निल कुसळेने ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारामध्ये ४५१.४ पॉइंण्टंस पटकावले. पहिल्या पात्रता फेरीमध्ये चीनच्या लियूने सुवर्णपदक पटाकवले असून, युक्रेनच्या सेरहिय कुशिकने ४६१.३ पॉइण्ट्स मिळवत सिल्व्हर मेडल मिळवले होते. स्वप्निल कुसळे याने अखेरच्या फेरीमध्ये तिसरे स्थान निश्चित केले. स्वप्निलच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे. महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते. यानंतर आज महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळे याने कांस्यपदकावर मोहोर उमटवत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकावला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत. स्वप्नीलपूर्वी मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचवेळी सरबज्योतसह मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.
——-
कोण आहे स्वप्नील कुसळे?
स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीचा आहे. ६ ऑगस्ट १९९४ मध्ये जन्मलेल्या स्वप्निलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. स्वप्निलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे. अभिनव बिंद्राला २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्निलने १२वीच्या परीक्षेकडे कानाडोळा केला. २००९ मध्ये वयाच्या १४ व्यावर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्निलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. त्याने आज पॅरिसमध्ये ऑलिंम्पिक पदकाला गवसणी घालताच, त्याचे जन्मगाव कांबळवाडीसह राधानगरी तालुक्यात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला.
————–