मेरा बुद्रूक, ता. चिखली (एकनाथ माळेकर) – येथून जवळच असलेल्या रामनगर येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत, सुदाम श्रीकृष्ण शितोळे यांचे घर फोडले आहे. नगदी रोखरक्कम तसेच इतर ऐवज यावेळी चोरट्यांनी लंपास केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे, की रामनगर येथील सुदाम शितोळे हे रात्रीच्या सुमारास भजनासाठी गेले होते. त्यामुळे रात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व घरातील रोख रक्कम तसेच इतर ऐवज लंपास केला. शितोळे हे भजनासाठी तर त्यांच्या सासू या आजारी असल्याने पत्नी तिकडे गेलेल्या आहेत. त्यामुळे घरी कुणीच नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी डाव साधला. दरम्यान, ग्रामस्थांच्या माहितीनुसार, पाच ते सहा चोर रात्रीच्या सुमारास परिसरात फिरत होते. त्यांनी अनेक घरांची चाचपणी केली. पण, नेमके घरी कुणीच नसल्याने सुदाम शितोळे यांचे घर फोडले. हे चोर गावात धुमाकूळ घातल्यानंतर सोयाबीनच्या शेतातून पसार झालेत. याप्रकरणी अंढेरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, सकाळी घटनास्थळी पोलिस आले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी रामनगर येथे येऊन परिसराची पाहणी करून पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. पुढील तपास पोलिस करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
———–