‘एक तर तू राहशील, किंवा मी’; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना ललकारले!
– हात उगारला त्याचे हात जागेवर ठेवायचे नाही; शिवसैनिकांना दिलेत आदेश!
मुंबई : मला आणि आदित्यला तुरूंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक डाव खेळले. माझ्या कुटुंबावर चालून आले. परंतु तरीही मी सगळे सहन करून हिमतीने उभा राहिलोय, असे सांगतानाच एक तर तू राहशील नाहीतर मी राहिन, असा उघड इशाराच मूळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिला. तसेच हात उगारला त्याचा हात जागेवर ठेवायचा नाही, असा आदेश देतो, असेही ते म्हणाले. हे सरकार गेल्यावर तिघेही आपापल्या गावी जातील, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
शिवसेना ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांची मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बैठक संपन्न झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या राजकारणाचा नेहमीप्रमाणे खरपूस समाचार घेतला. अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाही, अधिकृत चिन्ह नाही, पैसा नाही, पण मी प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देऊ शकतो ते केवळ तुमच्या भरोशावर, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा आमदार पक्ष कुणाचा? आणि चिन्ह कुणाचे? याविषयीचा निकाल लागेल तेव्हा लागेल पण मशालीचा प्रचार घरोघरी करा, असे आदेश त्यांनी शाखाप्रमुखांना दिले. यावेळी ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘अनिल देशमुखांनी सांगितले की मला व आदित्य ठाकरेंना आत टाकायचे डाव फडणवीस यांचे होते. सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलो आहे. एक तर तू राहशील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे चिन्ह, पैसा काहीच नाही. पण तुमच्या हिंमतीवर आव्हान देत आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.‘धनाढ्य व चोर्यामार्या करणारे दुबार मतनोंदणी करत आहेत. उपरी मुंबई वसवायला यांना मतदान करायचे का ? यावेळी झोपून राहिलो तर मुंबई उपर्यांच्या हातात जाईल. मराठीला प्रवेश नाही म्हणतात, पहिले कानफाट फोडा .गेटआऊट सांगून गुजरातला जायला सांगा. बुटचाटे लाचार खुर्चीसाठी आईवर वार करतायत,’ असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. कंत्राटदार माझा लाडका योजना सुरू आहे. सगळीकडे पाणी तुंबत आहे. हे विकासपुरूष आहेत. आरेचा भूखंड मुंबई बँकेला देतायत. त्यांचा भ्रष्टाचारी तिथे बसलाय ना. फनेल झोनमध्ये सध्या हवेतला टीडीआर काढतायत. अदानी माझा लाडला सुरू आहे. मुंबईच्या अस्तिवाची लढाई आहे. मोदींनी येत्या विधानसभा निवडणुकीत आलेच पाहिजेत. राहिलेली गुर्मीही काढू, असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २९ जुलैला पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, पार्थ पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर खोटे आरोप करण्यास आणि प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला होता. तसेच आपण हे केले असते तर आदित्य ठाकरे जेलमध्ये असते, असे म्हटले होते. तसेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे श्याम मानव यांनी फडणवीसांद्वारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांकडे ४ प्रतिज्ञापत्रांवर सही करुन देण्यास सांगितले. ज्याद्वारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार अडकतील. त्यामोबदल्यात तुम्हाला जेलमध्ये जावे लागणार नाही, यासाठी अनिल देशमुखांवर दबाव टाकल्याचा उघड आरोप करून खळबळ उडवून दिली होती.
ग्रामीण भागात ‘चोर कंपनी’चा प्रचार!
उद्धव ठाकरे म्हणाले, की मला अनेकांनी सांगितले-आमची चूक झाली, तुम्हालाच मतदान करायचे होते. ग्रामीण भागात चोर कंपनीने बाळासाहेबांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाला मत द्या म्हणून सांगितले. आम्ही तुम्हाला मतदान करू इच्छित होतो पण बाळासाहेबांचा धनुष्यबाण असे म्हणून आम्ही ‘त्यांना’ मतदान केले. आमची चूक झाली, असे काही लोकांनी मला सांगितले. पूर्वी धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या म्हणून आपण निवडणूक आयोगात गेलो होतो. आता मशाल हेच चिन्ह आम्हाला अधिकृतपणे द्या, अशी मागणी आपण निवडणूक आयोगाला करणार आहोत. तसेच मशालीला साधर्म्य असणारे कोणतेही चिन्ह इव्हीएम ठेवू नका, असेही आपण त्यांना सांगू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.