– विनानंबरच्या स्कुटीतून खताच्या गोणीत गावात आली होती दारू!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत प्रत्येक गावात अवैध दारूविक्रीला ऊत आला असून, पोलिसांच्या नाकावर टिच्चून ही दारूविक्री सुरू आहे. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी करणारी ही अवैध दारूविक्री बंद करावी, म्हणून महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. आज नेहमीप्रमाणे विनानंबरच्या स्कुटीतून दारू आणली जात होती. तेव्हा, सकाळी सहा वाजता गुंज गावात येणारी ही दारू संतप्त महिलांनीच पकडली व पोलिसांना पाचारण करून रंगेहाथ पकडलेला आरोपी सोपविला. यावेळी महिला चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसून आले, तर पोलिसांची चांगलीच अब्रू चव्हाट्यावर आली होती.
गुंज येथे मेहकर येथील एका दारु विक्रेत्याने विनानंबरच्या स्कुटीवर एका खताच्या पोतडीतून दोन बॉक्समध्ये १८० एमएलच्या ८० नग बॉटल घेऊन अतुल भगवान सपकाळ २७ वर्ष हा आला होता. महिलांना स्कुटी गावात आल्याचा सुगावा लागताच ४० ते ५० महिलांनी चक्क स्कुटी अडविली. ही माहिती माजी सरपंच दीपक तुपकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष तुपकर (अंकल) यांना दिली. त्यांनी तत्काळ साखरखेर्डा पोलीस स्टेशनला माहिती दिली असता, पोलिसांनी सकाळी जाऊन आरोपीच्या ताब्यातून दोन बॉक्स दारु जप्त केली. वाहन स्कुटीही जप्त करण्यात आली. केवळ गुंज येथेच नव्हे तर शिंदी, मोहाडी फाटा फळ, गोरेगाव फाटा, आंबेवाडी फाटा, पिंपळगाव सोनारा, लव्हाळा, लव्हाळा फाट्यावरील धाबा, वडगावमाळी, सावंगी माळी येथेही मोठ्या प्रमाणात अवैध दारुची विक्री केली जाते. या विरुद्ध महिलांनी पोलीस साखरखेर्डा पोलिस स्टेशनमध्ये घेरावदेखील घातला होता. बुलढाणा येथे जाऊन दारुबंदी कार्यालयात जाऊन आंदोलन केले होते. साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत फोफावत चाललेली अवैध दारूविक्री तत्काळ बंद करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्निल नाईक यांची बदली झाली असून, नवीन आलेले ठाणेदार गजानन करेवाड हे दारुबंदीसाठी काय भूमिका घेतात, याकडे महिलावर्गासह ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.
———-
गुंज येथे महिलांनी पकडलेली दारू.