– एसडीपीओ प्रदीप पाटील यांना निवेदन; दोन दिवसांत जनावरे शोधून द्या, नाही तर सर्व जनावरे पोलिस ठाण्यात बांधण्याचा इशारा!
बिबी (ऋषी दंदाले) – बिबी परिसरातील गावांत गुरेढोरे चोरणार्यांनी हैदोस घातला असून, लाखो रूपयांचे गो-धन रात्री-बेरात्रीच्या सुमारास चोरून नेले जात आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचे संतप्त झाले असून, बिबी पोलिसांचा डफडे वाजवून व पोलिस ठाण्यावर धाव घेत शेतकर्यांनी तीव्र निषेध केला आहे. दोन – तीन दिवसांत चोरीस गेलेल्या गुरांचा शोध लावा, अन्यथा आम्ही आमची गुरे-ढोरे पोलिस ठाण्यात आणून बांधू, असा इशारा संतप्त शेतकर्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, गुरे चोरणारे काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालेले असून, तरीदेखील पोलिसांना या चोरट्यांचा शोध लागत नसल्याने सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
सविस्तर असे, की बिबी व परिसरातील शेतकर्यांच्या शेतातून, गोठ्यातून अज्ञात चोरट्यांकडून गुरे-ढोरे चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. बिबीसह खंडाळा, पिंपरी खंदारे, खळेगाव, मांडवा, महारचिकणा येथून अज्ञात चोरट्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे पशुधन चोरून नेले आहे. अशा घटना बिबी पोलिस ठाणेहद्दीत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने सुरू असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठेच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. अगदी चारचाकी वाहनांतून गुरे चोरून नेली जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यांत दिसून येत आहे. चोरी गेलेल्या गुरांचा शोध लागत नसल्यामुळे बिबी व परिसरातील शेतकर्यांकडून डफडे वाजवून बिबी पोलीस स्टेशन येथे शेकडो शेतकरी जमा होऊन ठाणेदार यांना निवेदन न देता, परिसरातील या अगोदरही गुरांचा शोध न लागल्यामुळे हे निवेदन आम्ही सर्व शेतकरी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांना बोलावून त्यांनाच निवेदन देऊ, अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली. तसेच, उपविभागीय पोलीस अधिकारी येईपर्यंत पोलीस स्टेशनसमोर शेतकर्यांनी ठिया आंदोलन केले.परिसरातील शेतकर्यांच्या गुरांचा शोध दोन ते तीन दिवसात लावा. अन्यथा, पोलीस स्टेशनसमोर बिबी व परिसरातील सर्व गुरे आणून बांधण्यात येईल, असा इशारा यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांना देण्यात आला. यावेळी दीपक गुलमोहर, कार्तिक धाईत, भास्कर खुळे, अमोल मुळे, प्रवीण धाईत, अजय कायंदे, श्रीधर आटोळे, गोपाल काबरा, विनोद जाधव, आकाश बनकर, बद्रीनाथ गावडे, विठ्ठल वायाळ, समाधान पारधे, ओम रणमळे, रघुनाथ धाईत, अर्जुन धाईत, गणेश डुकरे, राम डुकरे, संचित केंद्रे, रामप्रसाद उगलमुगले, अभिषेक कायंदे, रमेश आंधळे, गोपाल पंधे, किरण मुंढे, नूतन काळुशे, सागर मुर्तडकर, कृष्णा रणमले, शिवाजी बनकर यांच्यासह शेतकर्यांनी दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदनही एसडीपीओ प्रदीप पाटील यांना दिले. गुरेचोरांचा बंदोबस्त करून लवकरच चोरीस गेलेल्या गुरांचा शोध लावला जाईल. तसेच परिसरात रात्रीची गस्त वाढवली जाईल, अशी ग्वाही यावेळी प्रदीप पाटील यांनी शेतकर्यांना दिली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन अज्ञात चोरट्यांचा कसून शोध सुरू केला असून, गुरे चोरणार्या सराईत चोरट्यांवर आपले लक्ष केंद्रीत केलेले असल्याची माहितीही हाती आली आहे.
————