– क्रीडा शिक्षणावर विशेष भर, शाळेने राज्याला दिले सर्वोत्तम नेतृत्व
चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील अंत्रीखेडेकर येथील जिल्हा परिषदेच्या मुले व मुलींच्या शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांनी क्रीडाक्षेत्रात विद्यार्थी चमकावेत म्हणून विशेष प्रयत्न सुरु केले असून, क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. शाळेत वेगवेगळे खेळ शिकवले जात असून, खासगी शाळांच्या तोडीसतोड गुणवत्ता या शाळेत निर्माण केली जात आहे. परिणामी, ग्रामीण भागातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना, ही शाळा मात्र पालक व विद्यार्थीप्रिय ठरली असून, पंचक्रोशीतील मुले-मुली येथे शिक्षणासाठी येत आहेत. विशेष म्हणजे, येथे मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असून, सावित्रीच्या लेकींना दर्जेदार शिक्षण, उत्तम क्रीडा व नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी मुख्याध्यापकांसह शिक्षकवर्ग प्रयत्न करत आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक परिहार सर व मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक सुभाष खेडेकर सर आणि त्यांचे सहकारी सहाय्यक शिक्षक ज्ञानेश्वर खेडेकर, श्री राऊत सर, लहाने सर, भगवानराव चेके हे शिक्षक शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा शिक्षणही महत्त्वाचे आहे, हे विद्यार्थ्यांना समजून सांगून, मुलांना शाळेमध्ये क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण करत आहेत. त्यामुळे या शाळेतून भविष्यात उत्तम क्रीडापटू घडणार आहेत. आज ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परंतु अंत्रीखेडेकर त्याला अपवाद आहे. येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये मुलांच्या संख्येपेक्षा मुलीची संख्या जास्त आहे. आज चोहीकडे पालक आपल्या मुलाला इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये शिकवण्याची इच्छा व्यक्त करतात. परंतु लहान मुलांना ज्या भाषेतून ज्ञान अवगत होते, ती भाषा मराठी पूर्व माध्यमिक शाळेमध्ये शिकवल्या जात आहे. तसेच मराठी पूर्व माध्यमिक शाळेमध्ये सेमी इंग्लिश असल्यामुळे मुलांमध्ये इंग्रजी भाषेची आवड निर्माण होत आहे. मराठी पूर्व माध्यमिक शाळा अंत्री खेडेकर येथे वर्गनिहाय शालेय शिक्षणाच्या तासिका घेण्यात येतात. त्यामुळे मुलांना शाळेमध्ये आवड निर्माण झाली आहे.
तसेच गावातील पालकांचे शाळेवर लक्ष असते. अनेक पालक आवर्जुन शाळांत जातात, मुख्याध्यापक, शिक्षकांशी संवाद साधतात. त्यांना हवी ती मदत करतात. त्यामुळे शिक्षक-पालक असा उत्तम संवाद येथे दिसून येतो. येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेचा मोठा इतिहास आहे. या शाळेमधून आज खूप मोठ्या पदावर तसेच उद्योगात माजी विद्यार्थी दिसून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हेदेखील या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून अंत्री खेडेकरच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात सन्मान आहे. आज या शाळेचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. असेच दर्जेदार विद्यार्थी घडविण्याचा विडा येथील दोन्ही मुख्याध्यापक व शिक्षकांनी उचललेला आहे.
—————
Leave a Reply