पूजा खेडकर प्रकरणावरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल!
– ‘यूपीएससी’तील गैरप्रकारावरून केंद्र सरकारला घेरले!
– आयएएस होणे कोट्यवधी तरूणांचे स्वप्न; या तरूणांच्या विश्वासावर यूपीएससीने पाणी फेरले – प्रियंका गांधी
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)ची फसवणूक करून आयएएस हे केडर प्राप्त करणारी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा दिलीप खेडकर हिच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यूपीएससीची फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, आयटी अॅक्ट व दिव्यांगतासंबंधी कायद्यांनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले असून, कोणत्याहीक्षणी पूजा खेडकरला अटक होऊ शकते. दरम्यान, यूपीएससीच्या प्रक्रियेवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी प्रश्न उपस्थित करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.
एकीकडे देशातील तरूण-तरूणी यूपीएससीमार्फत नागरी सेवेत येण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असताना पूजा खेडकर यांच्यासारखे व्यक्ती यूपीएससीच नाही तर सरकारची फसवणूक करून सनदी सेवा प्राप्त करत आहेत. आणि, त्यांना यूपीएससीतून अशा बनावटगिरीसाठी सहकार्य होते, ही गंभीर बाब असून, यूपीएससीच्या या अनैतिक कारभाराबाबत मोदी सरकारने देशाला उत्तर दिले पाहिजेत, असे प्रियंका गांधी-वढेरा म्हणाल्यात. त्यांनी यूपीएससीला अनेक प्रश्न विचारले असून, या अनैतिक व भ्रष्ट प्रकारामागे यूपीएससीचे कोणते अधिकारी आहेत, ते देशापुढे यायला हवेत, असे प्रियंका म्हणाल्यात. बनावट व बोगस प्रमाणपत्राआधारे कुणी नागरी सेवेतील सर्वोच्च पदावर सनदी अधिकारी कसे बनू शकते, याबाबत मोदी सरकारने देशाला उत्तर द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याने पूजा खेडकरप्रकरणी त्यांच्यावर संशयाची सुई वळली आहे. यूपीएससीच्या अंतर्गत गडबडी व अनागोंदीचा कारभार उघड झाल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. यूपीएससी उत्तीर्ण होणे हे देशातील कोट्यवधी तरूण-तरूणींचे स्वप्न असते. त्यासाठी ते जीवतोड मेहनत करतात. या तरूणांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे काम यूपीएससीने पूजा खेडकर प्रकरणातून केले आहे. बनावट व बोगस प्रमाणपत्राआधारे कुणी आयएएस होत असेल तर यूपीएससीच्या सर्वच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लागते, असा आरोपही काँग्रेसने केले आहेत.
———–