देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – चिखली तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचा उद्रेक सुरूच असून, दुष्काळी परिस्थिती व सततची नापिकी यामुळे तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील कर्जबाजारी शेतकरी रामहरी भिकाजी अंभोरे (वय ५०) यांनी आज (दि.20) विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले, वृद्ध आई असा आप्तपरिवार आहे.
विदर्भात कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान होत असून, शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय बनला आहे. त्यातच पीकविमादेखील शेतकर्यांना मिळत नसून, शेतकरी कर्जमाफीचा लाभही शेतकर्यांना मिळालेला नाही. शेतातील उत्पन्नातून जीवनखर्च भागत नसल्याने व डोक्यावरील कर्जही फेडता येत नसल्याने कर्जबाजारी झालेले शेतकरी मरणाच्या दारावर येऊन ठेपलेले आहेत. नापिकीमुळे हताश झालेल्या शेळगाव आटोळ येथील रामहरी अंभोरे या ५० वर्षीय कर्जबाजारी शेतकर्याने आज (दि.१९) विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या डोक्यावर विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेच्या चिखली शाखेचे ८९ हजारांचे कर्ज होते. तसेच, शेतीसाठी त्यांनी इतरही किरकोळ स्वरूपात हातउसणे कर्ज घेतले होते. तसेच, खासगी वित्त संस्थेचेही कर्ज होते. हे कर्ज फेडता न आल्याने नैराश्यात गेलेल्या रामहरी अंभोरे यांनी आजअखेर आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या अकाली निधनाने त्यांचे कुटुंबीय उघड्यावर पडले असून, त्यांचे कर्ज माफ करून त्यांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी केलेली आहे. या घटनेने शेळगाव आटोळसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.