‘लाडकी बहीण योजना’ सरकारचा डाव; दीड हजार रूपये आयुष्यभर पुरणार का?
– मराठा आरक्षणासाठी पाचव्यांदा उपोषण; विधानसभा निवडणूक लढविण्याचाही दिला इशारा
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाचव्यांदा उपोषणाला सुरूवात केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला रोखठोक शब्दांत इशारा दिला. त्याचसोबत त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणार्यांनी आंतरवाली सराटीमध्ये यावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. यावेळी ते म्हणाले, की ‘लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून सरकारने डाव टाकला आहे. त्यांचे १५०० रुपये आम्हाला आयुष्यभर पुरतील का? काहीतरी नव्या योजना आणतात. आता ते लाडका भाऊ, लाडकी मेहुणी व मेहुणा आदी नव्या योजनाही आणतील. त्यांचे दीड हजार रुपये आम्हाला ३ दिवसही पुरणार नाहीत, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेवर टीकास्त्र डागले.
आंतरवाली सराटीत उपोषणाला सुरूवात केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले, की राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाला पुन्हा एकदा धोका दिला आहे. त्यामुळे माझ्यावर पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ आली. आता मी मागे हटणार नाही. मराठा समाजाच्या तरुणांना नोकरभरती, प्रवेश प्रक्रिया आदी अनेक बाबतींत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने ईडब्ल्यूएस, ईबीसी व कुणबी हे तिन्ही प्रमाणपत्र सुरू ठेवावे, असे ते म्हणाले. या सरकारची मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही. यासाठी ते कोणतरी नवीन योजना आणतात. लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी, लाडका मेहुणा योजनाही आणतील. या योजनेमुळे गर्दी झाल्यामुळे साईट बंद पडली, एवढा लोड त्यावर आला आहे. सर्व जातींना अशा योजना जाहीर करून तुम्ही आरक्षणाचा मुद्दा दुर्लक्षित करू शकत नाही. या योजनेच्या माध्यमातून मते विकत घेतल्याचे वाटत असेल, पण असे काहीही होणार नाही. तुम्ही देत असलेले १५०० रुपये आम्हाला आयुष्यभर पुरणार आहेत का? ते ३ दिवसही पुरणार नाहीत, असे जरांगे पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत, मराठा समाजाला विधानसभेच्या सर्वच २८८ जागांचा डेटा तयार करण्याचे आवाहन केले. तुम्ही २८८ जागांचा डेटा तयार करा, त्यानंतर लढायचे की पाडायचे हे आपण २९ ऑगस्टला ठरवू, असे ते म्हणाले. मराठा समाजासाठी तुम्हाला मतदान करायचे आहे. खूप जणांनी इच्छूक न राहता आपल्या माणसांसाठी काम करा, टफ फाईट होऊ द्या. आपण निवडणूक लढवायचे म्हणालो तर महायुती खूश होत आहे, त्यांना वाटते आपले उमेदवार निघून जाईल. तर मविआवाले म्हणतात मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत बोलू नका. ओबीसीबद्दल बोलू नका, महायुतीने आरक्षण दिले नाही तर आपल्याला मराठा समाज साथ देईल, अशी मविआची भूमिका असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता तेवढा वेळ आम्ही दिला आहे. आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा. आरक्षणाबाबत आम्ही ठाम आहोत. सगेसोयरेची अंमलबजावणी करा. कुणाच्या हरकती असतील तर आम्हाला त्याच्याशी देणेघेणे नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत. २००४ चा कायदा सुशीलकुमार शिंदे सरकारने बनवला आहे. तुम्ही त्या कायद्यात दुरुस्ती करा किंवा दुसरा कायदा बनवला तरी मला हरकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
बोगस कागदपत्रे काढून आयएएस बनता?
मनोज जरांगे म्हणाले की, पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी पोलिसांनी मराठा विद्यार्थ्यांवर खुल्या प्रवर्गातून सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली आहे. जे लोक बोगस कागदपत्रे सादर करतात त्यांना तुम्ही आयएएस करत आहात आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकडे खरी कागदपत्रे असताना अन्याय सुरू आहे. सगळी कागदपत्रे असताना पोलिसांनी मराठा समाजाच्या उमेदवारांकडून खुल्या प्रवर्गातून चाचणी देणार असल्याची संमतीपत्र जबरदस्ती लिहून घेतली आहेत. काही जातीयवादी पोलिस अधिकार्यांकडून हे प्रकार सुरू आहेत. काही लोक बोगस कागदपत्रे सादर करत आएएस बनत आहेत मात्र, आमच्याकडे खरी कागदपत्रे असूनही अन्याय होत आहे.
———-