अखेर पंकजा मुंडेंच्या डोक्यावर विजयाचा गुलाल पडला; सहा वर्षांनंतर राजकीय वनवास संपला!
– राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)ने पाठिंबा दिलेल्या शेकाप नेते जयंत पाटलांचा पराभव
मुंबई (खास प्रतिनिधी) – विधानपरिषद निवडणुकीत भाजपनेत्या पंकजा मुंडे-पालवे यांचा विजय झाला आहे. त्यांना विजयासाठी आवश्यक असणार्या २३ मतांच्या कोट्यापेक्षा ३ अतिरिक्त म्हणजे २६ मते मिळाली. या विजयामुळे पंकजा यांचा गत काही वर्षांपासून सुरू असणारा राजकीय वनवास संपुष्टात आला आहे. ११ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटल्याने महायुतीचे ९ पैकी ९ उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या निकालाने सदाभाऊ खोत, मिलिंद नार्वेकर आता आमदार झाले आहेत. आमदार संख्या कमी असताना देखील महायुतीने बाजी मारली अन् महाविकास आघाडीचा गेम केला. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची २ तर काँग्रेसची सहा मते फुटली, असा दावा माजी मंत्री आणि भाजप आमदार संजय कुटे यांनी केला आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने ९ उमेदवार रिंगणात उतरवले होते. पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर हे भाजपचे उमेदवार होते. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसेच अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे उमेदवार होते. महाविकास आघाडीला मात्र तीनपैकी फक्त दोन उमेदवारांना निवडून आणण्यात यश आले आहे. यामध्ये सुरुवातीच्या कलामध्ये मिलिंद नार्वेकर यांना आघाडी पाहायला मिळाली. नार्वेकर यांचा अखेर २३ मतांनी विजय झाला पण शेकापचे जयंत पाटील यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. जयंत पाटील यांना १२ मते पडली तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना तब्बल २५ मते पडली. या निवडणुकीसाठी विजयासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पण पंकजा मुंडे यांना या मतांपेक्षा जास्त ३ म्हणजे २६ मते मिळाली. यामुळे २०१४ नंतर तब्बल १० वर्षांनी त्यांना विजयाचा गुलाल उधळण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह शेकडो समर्थकांनी विधानभवन परिसरात येऊन विजयाचा जल्लोष केला.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास अखेर संपला आहे. पंकजा यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांचा तब्बल २४ हजार मतांनी पराभव केला होता. या विजयानंतर त्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा करत विजयाचा गुलाल उधळला. पण त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी त्यांना पराभवाचा धक्का दिला. तेव्हापासून अक्षरशः राजकीय विजनवासात गेल्या होत्या. त्यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, असा दावा केला जात होता. पण भाजपने अनेक नवख्या चेहर्यांना संधी दिली आणि पंकजा मुंडेंना वेटिंगवरच ठेवले. विधानपरिषदेनंतर राज्यसभेच्या निवडणुकीतही पंकजा यांचे नाव चर्चेत आले. पण त्यांना संधी मिळाली नाही. भाजपने त्यांच्याजागी भागवत कराड यांना संधी दिली. त्यानंतर भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना बीड लोकसभा मतदारसंघातून संधी दिली. पण दुर्देवाने त्यांना या निवडणुकीतही पराभवाची चव चाखावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी त्यांना अस्मान दाखवले. या पराभवानंतर भाजपने पुन्हा त्यांना विधानपरिषदेची संधी दिली आणि अखेर त्यांचा आज विजय झाला. या विजयामुळे बीडमध्ये त्यांच्या विजयाचा मोठा जल्लोष केला जात आहे.
——–
पंकजा मुंडे विजयी झाल्यानंतर त्यांच्या बहिण माजी खासदार प्रितम मुंडे भावूक झाल्या, त्यांना अश्रू अनावर झाले. अतिशय आनंदाची आणि स्वप्नपूर्तीची भावना आहे. गेले अनेक दिवस आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्या पाठिशी उभ्या राहिलेल्या प्रत्येक माणसाचा हा विजय असल्याचे त्या म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीनंतर ज्या पाच युवकांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले, त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी थोडा धीर धरला असता आणि असे पाऊल उचलले नसते तर बरे झाले असते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
———-