BuldanaBULDHANAChikhaliVidharbha

शेतकरी कर्जमुक्ती योजना पूर्ण करा; अन्यथा शेतकरी भाजपला सत्तेतून हद्दपार करेल!

– सामाजिक कार्यकर्ते शेणफडराव घुबे व एकनाथ पाटील थुट्टे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय!

चिखली (महेंद्र हिवाळे) – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना पूर्ण करा व राज्यातील साडेपाच लाख व बुलढाणा जिल्ह्यातील ५० हजार शेतकर्‍यांना या कर्जमाफी योजनेचा राहिलेला लाभ द्या, अन्यथा भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील शेतकरी हद्दपार करतील, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी चळवळीचे नेते शेणफडराव घुबे व एकनाथ पाटील थुट्टे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शेतकर्‍यांच्या उपस्थितीत निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत सरकारला नुकतेच शेतकरी कर्जमुक्तीसाठी निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन.

या निवेदनात नमूद आहे, की २०१४ मधे सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने १-४-२००९ ते ३१-३- २०१६ या काळात थकित कर्जदारांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना जाहीर करून शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या योजनेमध्ये अत्यंत जाचक अटी व तांत्रिक अडचणी निर्माण होत गेल्या. सरकारमधील प्रशासकीय अधिकारी, बँकांचे अधिकारी व योजना राबविणारी यंत्रणा यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव यामुळे सरकारला वेळोवेळी कर्जमाफीचे निकष बदलावे लागले. सरकारची पाच वर्षे सरून गेली तरी २२ टप्यात ही योजना राबविण्याचा सरकारने प्रयत्न केला, व शेवटी २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर आले. ठाकरे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी सत्तेत असलेल्या फडणवीस सरकारने ही योजना घिसाडघाईने राबविल्यामुळे व त्यामधील त्रुटीमुळे एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील ४९ हजार ९९९ शेतकरी पात्र असूनही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले. तर संपूर्ण महाराष्ट्रात आज रोजी ५ लाख ५५ हजार ५०० शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. सन २०१९ मध्ये सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने फडणवीस सरकारची ही योजना बासनात गुंडाळून ठेवली व महात्मा ज्योतिबा फुले सन्मान कर्जमाफी योजना जाहीर करून बर्‍यापैकी राबविण्याचा प्रयत्न केला. सदर योजनेमध्ये पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर करून नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रुपयांचे अनुदान घोषीत करुनही योजना १-४-२०१५ ते ३० -९-२०१९ या काळासाठी लागू केली. महाविकास आघाडी सरकारच्या दुर्देवाने २०१९ व २०२० या काळात कोरोनाने धुडगूस घातला व त्यामुळे सरकारचे आर्थिक बाबीचे नियोजन कोलमडल्यामुळे दोन लाख रुपयांचे कर्ज नियमित भरणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याचे घोषित करुनही सदर अनुदान देता आले नाही. त्यामुळे नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांवर अन्याय झाला. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे. तद्वतच एकनाथ शिंदेंनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळून महायुतीचे सरकार स्थापन झाले. या दोन वर्षांच्या काळात अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना पूर्णपणे गुंडाळून शेतकर्‍यांना न्याय देण्याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही सरकारने कोणतीही दाद दिली नाही व शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले. पीकविम्याचा परतावा नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत जाहीर करूनही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली नाही. पोकळ आश्वासने देऊन शेतकर्‍यांना झुलवत ठेवण्याचे काम हे सरकार करित असल्याने शेतकरीवर्गामध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. अत्यंत महत्वाची बाब म्हणजे २०१४ ते २०१९ या काळात ३३ हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या असून, त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे ८० टक्के आत्महत्या ह्या एकट्या विदर्भातील आहेत. बुलढाणा, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. लाडली बहीण यासारखी भंपक व फुकटी योजना सरकारने जाहीर करुन शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार शासनाने केला असून, या योजनेमुळे शेतमजुरांचा तुटवडा येवून शेती व्यवसाय कोलमडून पडण्याची भीती आहे व त्यामुळे आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारचे धोरण हेच शेतकर्‍यांचे मरण ही सरकारची भूमिका शेतकर्‍यांना आत्महत्येच्या खाईत लोटणारी असून, शेतकरी पुरता हतबल झाल्याचेदेखील या निवेदनात नमूद आहे.

आणखी महत्वाची बाब म्हणजे फडणवीस सरकारने २०१७ मध्ये जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना जाहीर करतांना तत्कालीन सरकारच्या शासन निर्णय क्र. कृकमा ४१८/प्र क्र. ५३/२-स नुसार ही योजना १-४-२००१ पासून ३१-३-२०१७ पर्यंत राबविण्यात यावी, असा स्पष्ट उल्लेख असतांना सरकारने ही योजना १-४-२००९ ते ३१-३-२०१६ या काळासाठी जाहीर करून अत्यंत घिसाडगाईत राबवून व लाखो शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनेच्या लाभापासून हेतुपुरस्सर वंचित ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आलेला आहे. २०१४ ते २०१९ ह्या काळात देवेंद्र फडणवीस हे पूर्णवेळ पॉवरफूल मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते तर आजही ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असून, दिल्ली दरबारी त्यांच्या शब्दाला फार मोठा मान आहे. विदर्भातील पॉवरफूल व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आदराने पाहिले जाते, ही विदर्भाच्या दृष्टीने गौरवाची बाब असली तरी व आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी विदर्भातील जनतेची फसवणूक केली, असे फडणवीस साहेब नेहमीच म्हणत असतात, असे असूनही त्यांच्याच काळात शेतकर्‍यांवर होत असलेला अन्याय फडणवीस हे दूर करु शकत नसतील तर भाजपला कशासाठी मते द्यायची? असा सूर जनतेमध्ये उमटू लागला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवापासून भाजपच्या नेत्यांनी धडा घेतला नाही तर महाराष्ट्रातून भाजप हद्दपार करण्याची भाषा शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे. एकीकडे शेतीसाठी लागणारे खते, कीटकनाशके, तणनाशके, बी-बियाणे, कृषी अवजारे, सिमेंट, लोखंड, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असतांना सोयाबीनचे भाव मात्र रसातळाला पोहोचल्यामुळे व निसर्गाच्या अवकृपेमूळे शेतकरी हतबल झाला आहे. महाराष्ट्रात आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली असून, ४ जुलै रोजी देऊळगाव घुबे येथील गणेश घुबे व चार महिन्यापूर्वी चिणकुबा घुबे या तरुण शेतकर्‍यांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपविले असल्याचाही उल्लेख निवेदनात आहे. हे सर्व टाळायचे असेल तर अर्धवट राहिलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना १-४-२००१ पासून ३१ ३-२०२४ पर्यंत तिचा कालावधी वाढवून राबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. इतके करुनही सरकारने शेतकर्‍यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याची किंमत भाजपला मोजावी लागेल, असा स्पष्ट इशारा या निवेदनातून सरकारला देण्यात आला आहे. या निवेदनावर शेणफडराव घुबे, एकनाथ पाटील थुट्टे, प्रकाश पाटील घुबे, विलास मुजमुले, दिनकरराव घुबे, दुसरबीड येथील शिवानंद सांगळे, सुनील घुगे, शे. खालेद, अनिरुद्ध सांगळे, रामेश्वर सांगळे, विजय शिपे, सचिन घुगे, मनोहर वाघ, भरोसा येथील ज्ञानेश्वर थुट्टे, ऋषीकेश थुट्टे, किसन थुट्टे, नागेश थुट्टे, अशोक थुट्टे, शेषराव जाधव, कैलास शेटे, देवेंद्र चेके , विजय जाधव, रामदास जोहरे, बंच्छी जोहरे, गणेश थुट्टे, पुंजाजी थुट्टे, असोला जहांगीर येथील दीपक शेळके, माजी सरपंच शरद मांटे, गांगलगांव येथील ज्ञानेश्वर सावळे, दत्तात्रय सावळे, अमोल सावळे यांच्यासह असंख्य शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!