ChikhaliHead linesVidharbha

डॉ. विकास मिसाळ यांनी करून दाखवले; शिंगणे साहेबांकडून देऊळगाव घुबे- शेळगाव आटोळ रस्त्यासाठी साडेनऊ कोटी रूपये आणले!

चिखली (महेंद्र हिवाळे) – पूर्णपणे उखडल्याने वाहतुकीस धोकादायक बनलेल्या देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ या रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून अखेर या रस्त्यासाठी नऊ कोटी ५० लाख रूपयांचा निधी अखेर मंजूर करून आणला आहे. त्यामुळे देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळदरम्यानच्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच रस्त्याच्या कामासाठी डॉ. मिसाळ यांनी सातत्याने आंदोलने केली होती.

चिखली तालुक्यातील परंतु सिंदखेडराजा-देऊळगाव राजा विधानसभा मतदारसंघात येणार्‍या मलगी ते इसरूळ या प्रमुख रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते डॉ. विकास मिसाळ यांनी सातत्याने आंदोलने व पाठपुरावा केला होता. तसेच, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’नेदेखील याबाबत तीव्र आवाज उठवला होता. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मलगी ते देऊळगाव घुबेपर्यंतचे काम झाले होते. त्यानंतर देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळचे काम रखडले होते. त्यासाठी डॉ. मिसाळ यांनी तीव्र आंदोलने करून बांधकाम विभागाला निवेदनेही दिली होती. तसेच, आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार, आ. डॉ. शिंगणे यांच्या प्रयत्नातून देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ या रस्त्यासाठी अखेर साडेनऊ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून, तशी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. या निधीत देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ रस्त्याची रूंदीकरणासह सुधारणा करणे, बायगाव खुर्द गावातील सिमेंट रस्ता, देऊळगाव मही गावातील नाली बांधकाम आदी कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. सद्यस्थितीत इसरुळ ते शेळगाव आटोळ रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून, उर्वरित देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ रस्ता रुंदीकरण कामासाठी 9.50 कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. डॉ. विकास मिसाळ यांच्या प्रयत्नातून ही कामे होत असल्याने परिसरातील देऊळगाव घुबे, पिंपळवाडी, मिसाळवाडी, शेळगाव आटोळ या गावांतील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

देऊळगाव घुबे, मिसाळवाडी, शेळगाव आटोळ रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे.

—-

मलगी ते इसरूळ-मंगरूळपर्यंत रस्ता खराब झाला होता. मागीलवेळी आंदोलन केले तेव्हा मलगी ते देऊळगाव घुबे हा रस्ता करून घेतला होता. आतादेखील आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून राहिलेल्या देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ या रस्त्यासाठी साडेनऊ कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. या निधीतून या भागातील दर्जेदार रस्ता हा रूंदीकरणासह होणार आहे. हे रस्ते चांगले झाले तरी अवैध वाळूतस्करीच्या रात्रंदिवस चालणार्‍या वाहनांमुळे ते उखडतात व खराब होतात. त्यामुळे या भागातील ही चोरटी वाळू वाहतूकही प्रशासनाने तातडीने बंद करावी.
– डॉ. विकास मिसाळ, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!