‘लाडक्या बहिणी’ला सावत्रपणाची वागणूक?; मेहकर मतदारसंघातील विकास कामांचाही बट्ट्याबोळ!
– माजी मंत्री सुबोध सावजी यांचा आरोप
– महाविकास आघाडीने विधानसभेचा उमेदवार जाहीर करून कामाला लागावे!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्य शासनाने महिलांसाठी नुकतीच मुख्यमंत्री आपली लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. योजनेचा लाभ आपल्याला होईल, या आशेने महिला मात्र कागदपत्र जमा करण्यासाठी फिरताना दिसत आहेत. ही एक प्रकारची बहिणीला सावत्रपणाची वागणूक आहे, तर मेहकर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधीची विकास कामे सुरू असल्याच्या बातम्या आपण वाचतो, परंतु प्रत्यक्षात सदर कामांचा बट्ट्याबोळ सुरू असून, सदर कामे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहेत, असा गंभीर आरोप माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केला आहे. लाडक्या बहीणीला खरच योजनेचा लाभ द्यायचा असेल तर महिलांचे अर्ज घरोघरी जाऊन भरून घ्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील जैन स्थानक येथे नियोजन बैठक पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महंमदखा पठाण तर पन्नालाल बेगाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुबोध सावजी म्हणाले की, मेहकर विधानसभा मतदारसंघातील समृद्धी महामार्ग, जानेफळ बायपाससह इतर कामांची आपण काही दिवसापूर्वी पाहणी केली. सदर कामावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून, त्या तुलनेत कामाची गुणवत्ता नाही. लोकसभा निवडणुकीत योग्य नियोजनाअभावी महाविकास आघाडीचा उमेदवाराचा फार थोड्या मताने पराभव झाला, अशी खंत व्यक्त करत, आता महाविकास आघाडीने मेहकर विधानसभेसाठी तातडीने उमेदवारी जाहीर करून कामाला लागावे, अशी मागणी करून याबाबत आपण वरिष्ठांशीदेखील चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अगोदर डोणगाव, जानेफळ, नायगाव दत्तापूर येथेही आपण नियोजन बैठका घेतल्या असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही ते म्हणाले. यावेळी माजी उपसरपंच मधुकर पाचपवार, शे. निसार पटेल, कवरसिंग चव्हाण, शिवसेना (ठाकरे) शाखाप्रमुख नरेश साठे, प्रेम पाचपवार, प्रभाकर राठोड, नरेंद्र पवार, किसन राठोड, सुभाष राठोड, शेखर पाटील, पत्रकार संतोष गडकर, पत्रकार नवल राठोड, त्र्यंबक अवधूत, पंडित देशमुख, किसन आमले, कृष्णा खंडारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार रणजीत देशमुख यांनी मानले.