शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाचा दिलासा; पक्षाला मिळाली अधिकृत मान्यता!
– अजित पवारांचा जीव टांगणीला; १६ जुलैला पक्षाचे चिन्ह व नावाबाबत होणार महत्वपूर्ण सुनावणी
नवी दिल्ली (खास प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत राज्यात १० पैकी ८ जागा जिंकून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला. निवडणूक आयोगाने या पक्षाला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे कलम २९ ब नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे. दुसरीकडे, अजित पवार यांचा जीव टांगणीला लागलेला असून, दि. १६ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. हा निर्णयसुद्धा कोणाच्या बाजूने जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये दहापैकी आठ खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडून आले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या आधारे संख्याबळाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले होते. यानंतर दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला खरा पक्ष म्हणून मान्यता देत, पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मतदारांनी शरद पवार गटाला घवघवीत य़श दिल्याने निवडणूक आयोगाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली असून, कलम २९ ब नुसार देणगी स्वीकारण्याचा अधिकार पक्षाला देण्यात आला आहे. निवडणूक आयोगासमोर आज झाली सुनावणी झाली असताना हा निर्णय देण्यात आला.
सुप्रिया सुळे यांनी मानले मतदारांचे आभार!
‘आज आमच्या दिल्लीत ४ केसेस होत्या. ३ केस सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगात एक केस होती. ज्याप्रकारे पक्ष आणि चिन्ह पक्षाचे संस्थापक असणार्या शरद पवारांकडून काढून घेण्यात आले होते. पण मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानते. जरी शरद पवारांवर अन्याय झाला असला, तर जनतेने त्याची नोंद घेतली. मतांच्या रुपाने शरद पवारांना आशीर्वाद आणि सहकार्य आम्हाला साथ दिली. आम्ही त्याबद्दल त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. मनपूर्वक आभार मानतो,’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्यात.