BULDHANAHead linesSINDKHEDRAJA

‘महसूल’चे ठरावीक अधिकारी सिंदखेडराजाच्या ‘मोहा’त कसे?

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा तहसील कार्यालयामध्ये ऐवढा अनगोदी कारभार सुरू झाला आहे की, कुणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिला नाही. बदली झाल्यानंतर पुन्हा तेच ते अधिकारी आणि कर्मचारी रुजू होत आहेत. यात दलालांचे चांगभलं होत असल्याने बदलून आलेल्या कर्मचार्‍याप्रती चाटुगिरी करण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत हे अधिकारी येथेच राहिले तर शासनाच्या एकूण कारभारावर नियंत्रण नसल्याचा संशय नागरिकांना येऊ लागला आहे. काही ठरावीक अधिकार्‍यांना सिंदखेडराजाचा इतका मोह कसा, याबाबत आता वरिष्ठ अधिकार्‍यांनी खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. 

सिंदखेडराजा तालुक्यात रेतीतस्करांचे जाळे निर्माण झाले आहे. खडकपूर्णा नदीपात्रातून रेती उपसा करून टिप्पर कोणत्यामार्गे चालले यांची माहिती काही अधिकार्‍यांना लगेच मिळते. मलकापूर पांग्रा येथे टिप्पर येताच दलालामार्फत व्यवहार ठरवून रेतीचे टिप्पर सोडले जाते. बिचारे मंडळाधिकारी आणि तलाठी (भरारी पथकातील) काहीच करु शकत नाही. साखरखेर्डा येथील टी पॉईटवर एक दलाल अधिकार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी तैनात करण्यात आला आहे. काही कार्यकर्त्यांनी महसूल विभागाला रेती वाहनाची माहिती दिली तर ते म्हणतात पटवारी सुट्टीवर आहे. मग भरारी पथकातील कर्मचार्‍यांना सांगा असे म्हटले तर तुम्ही आमचे बॉस आहे का? तुम्ही तुमचे काम करा! असे उद्गार या अधिकार्‍यांचे असतात. एखाद्या टिप्परवर कारवाई करण्याचे धाडस केले तर संबंधित अधिकारी दुसर्‍याच प्रकरणात कर्मचार्‍यांना गोवण्याचा प्रयत्न करतात, अशी खदखद एका कर्मचार्‍याने व्यक्त केली. सिंदखेडराजा तहसील कार्यालय हप्तावसुलीसाठी फेमस झाले आहे. मागील एप्रिल महिन्यात रेती प्रकरणात हप्ता वसुलीवरून तहसीलदार सचिन जैस्वाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. केवळ रेती माफियाकडून मिळत असलेल्या मलिद्यासाठी काही अधिकारी सिंदखेडराजा येथे पुन्हा पुन्हा येत आहेत. केवळ रेतीच नाही तर अनेक प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दलाल नियुक्त केले आहेत. साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा या भागातील नागरिकांना तहसील कार्यालय कोतवालबुक नक्कल, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्डातून नाव कमी करणे, समाविष्ट करणे, रेशन कार्ड वेगळे करणे या सर्व कामांसाठी दलाल नियुक्त केले आहेत. काही दलाल तर एका अधिकार्‍याच्या दालनात दररोज तळ ठोकून बसलेला असतो. ते नेमके ते कशासाठी? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. काही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार साहेबराव शिंगणे यांनी एका अधिकार्‍याच्या बदलीसाठी प्रशासनाला निवेदन दिले आहे, त्या निवेदनामध्ये त्यांनी नमूद केली आहे की, निवासी नायब तहसीलदार या अगोदरसुद्धा सिंदखेडराजा येथे कार्यकाळापेक्षा अनेक वर्ष राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचे हितसंबंध अनेकांशी आहेत, त्यामध्ये शेतीचे प्रकरण उत्पन्नाचे दाखले सेतु केंद्रचालक त्याचबरोबर अवैध रेती व्यवसाय करणारे व्यावसायिक यांचे चांगभलं होत असतांनाच सर्वसामान्य नागरिकांची फरफट होत आहे. तेव्हा त्यांची निवडणुकीपूर्वी बदली करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
———-
सिंदखेडराजा तहसीलच्या मोहामुळे वारंवार येथे आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांबाबत जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित अधिकार्‍याची बदली केली नाही तर तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार हे थेट महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे धाव घेणार असल्याची माहिती हाती आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!