सिंदखेडराजा – शेगाव भक्तीमहामार्ग रद्द करून शेतकर्यांना आश्वस्त करा!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गासंदर्भात शासनाने अधिसूचना जारी केली. जमीन अधिग्रहणाची कारवाईदेखील प्रशासन करत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी सुपीक जमीन जाणार असल्याने धास्तावला आहे. हा महामार्ग रद्द व्हावा, यासाठी कृती समिती सातत्याने पाठपुरावा करीत आहे. यासाठी जिल्हाभर थाळीनाद आंदोलनदेखील करण्यात आले. सदर बिनकामाचा रस्ता रद्द करून शेतकर्यांना आश्वस्त करावे, अशी मागणी दि.२८ जूनरोजी उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांच्याकडे महामार्गविरोधी कृती समितीचे डॉ.सत्येंद्र भुसारी, देविदास कणखर, विनायक सरनाईक, अशोक पडघान, बिंदूसिंह इंगळे यांच्यासह सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे.
मातृतीर्थ सिंदखेडराजा ते शेगावपर्यंत नव्याने होवू घातलेल्या भक्ती महामार्गाच्या निर्मितीकरिता शेतकर्यांच्या शेत जमिनी अधिग्रहीत करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. या महामार्गामध्ये सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, खामगाव आणि शेगाव या तालुक्यातील ४६ गावातील असंख्य शेतकर्यांच्या पिकावू काळ्या कसदार जमिनी अधिग्रहीत केल्या गेल्यास मार्ग निर्मितीतून शेतजमिनीचे विभाजन होणार असून, असंख्य शेतकरी भूमिहीन होवून त्यांच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे. त्यामुळे महामार्गबाधीत शेतकर्यांच्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंदखेडराजामार्गे शेगाव या तीर्थस्थळी जाणार्या भाविकांकरिता अनेक पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत. नव्याने होणार्या महामार्गाच्या निर्मितीकरिता जिल्ह्यातून कोणतीही मागणी केलेली नसतांना केवळ राज्यातून शेगावला जाणार्या प्रवाशांच्या प्रवासातील काही मिनटे वाचविण्याकरीता असंख्य शेतकर्यांवर संभाव्य उपासमारी कशासाठी? असा प्रश्न शेतकर्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे. सदरचा महामार्ग रद्द करण्यासाठी जिल्हाभर आंदोलनाचा भडका उडाला असून, सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी यांना सिंदखेडराजा ते शेगाव महामार्ग रद्द करण्याची मागणी महामार्गविरोधी कृती समितीसह शेतकर्यांनी केली आहे. यावेळी सत्येंद्र भुसारी, देविदास कणखर, विनायक सरनाईक, अशोकराव पडघान, बिंदूसिंह इंगळे, दिलीप सानप, अमोल ठाकरे, रामदास सानप, भगवान पालवे, रामकिसन नागरे, सर्जेराव पडघान, रामेश्वर शिंगणे, तेजराव मुंडे, रविंद्र सानप, विठोबा मुंडे, सिध्दार्थ जाधव, जगन्नाथ मुंडे, बाजीराव मुंडे, विशाल बोंबले यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
जोपर्यंत रद्दचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत आंदोलने होणारच…!
कृती समिती जेव्हापासून अधिसूचना निघाली तेव्हापासून यासंदर्भात हरकती नोंदविण्यासह निवेदन देत आहे. आंदोलन करीत आहे. थाळीनाद आंदोलनाने शासनाची कानठाळीसुद्धा बसली. या आंदोलनाची दखल म्हणूनच एमएसआरडीसीची व्हिडिओ कॉन्फरन्सदेखील झाल्याचे कळते. परंतु जोपर्यंत राज्य सरकार महामार्ग रद्दचा निर्णय घेत नाही, तोपर्यत आंदोलन हे होणारच, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे.