– सहदेव लाड व शेतकरी संघटनेचे १ जुलैचे आंदोलन स्थगित
बिबी (ऋषी दंदाले) – बिबी ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्यांविषयी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दि. २४ जूनला बुलढाणा जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदन देऊन रुग्णालयातील समस्या सोडविण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास १ जुलैरोजी ग्रामीण रुग्णालय बिबी येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या धाकामुळे घाबरलेल्या आरोग्य प्रशासनाने तातडीने रक्त व लघवी तपासणी मशीन बिबी ग्रामीण रूग्णालयास उपलब्ध करून देत, चार वैद्यकीय अधिकार्यांचीदेखील या ग्रामीण रुग्णालयात नेमणूक केली आहे. तसे लेखीपत्रच आरोग्य विभागाच्यावतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. शहा यांनी ग्रामीण रुग्णालय बिबी येथे लाड यांच्यासोबत चर्चा करून त्यांना दिले आहे. त्यामुळे सहदेव लाड व त्यांच्या सहकार्यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.
सविस्तर असे, की लोणार तालुक्यातील सर्वात मोठे ३० खाटांचे रुग्णालय म्हणून जिल्ह्यात ओळख असणार्या बिबी ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या एक वर्षापासून रक्त व लघवी तपासणी मशीन बंद होती. रुग्णांना बाहेरील तपासणी केंद्रामधून रक्त-लघवी तपासणी करावी लागत होती. त्याचा गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. तसेच या रुग्णालयामध्ये फक्त एकच वैद्यकीय अधिकारी हे उपस्थित राहत होते. त्यामुळे रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांची मोठी हेळसांड होत होती. त्यामुळे या ग्रामीण रुग्णालयामध्ये रक्त व लघवी तपासणी मशीन व वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
या आंदोलनाच्या धसक्याने जिल्हा आरोग्य विभागाने रक्त व लघवी तपासणी मशीन उपलब्ध करून देऊन, चार वैद्यकीय अधिकार्यांचीसुद्धा ग्रामीण रुग्णालयामध्ये नेमणूक केली आहे. तसे लेखीपत्र आरोग्य विभागाच्यावतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. शहा यांनी ग्रामीण रुग्णालय बिबी येथे सहदेव लाड यांच्यासोबत चर्चा करून त्यांना दिले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोणार तालुका उपाध्यक्ष अनिल लांडगे, कार्तिक धाईत व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.