बिबी (ऋषी दंदाले) – जळक्या प्रवृत्तीच्या अज्ञात समाजकंटकाने शेतात चांगली उगवण झालेल्या कपाशीची ४०० झाडे उपटून फेकत, आपल्या जळक्या वृत्तीचे दर्शन घडविले. ही दुर्देवी घटना लोणार तालुक्यातील मांडवा शिवारात घडली. याप्रकरणी बिबी पोलिसांत अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या जळक्या प्रवृत्तीचा इसम लवकरच शोधून त्याला कायद्याचा बडगा दाखवू, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सविस्तर असे, की दिनांक २६ जूनच्या रात्रीला द्वेष भावनेने अज्ञाताने लोणार तालुक्यातील मांडवा शिवारातील गट नंबर २०१ या गटामध्ये शेतकरी मंदा दिलीप इंगळे यांच्या ७२ आर शेतातील कपाशीची झाडे उपटली. शेतकरी इंगळे यांनी २०२४ च्या चालू वर्षांमध्ये मृग नक्षत्रामध्ये कपाशी या पिकाची लागवड केली होती. इंगळे हे शेतकरी २५ तारखेला आपल्या शेतातील दिवसभराचे कामकाज आटोपून रात्रीला घरी गेले व दुसर्या दिवशी सकाळी शेतामध्ये गेले असता, त्यांना अज्ञाताने कपाशीची ४०० झाडे उपटून टाकलेली असल्याची त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात इसमाने असा खोडसाळपणा केल्यामुळे या शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत शेतकरी इंगळे यांनी बिबी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून बिबी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत. हा आरोपी कुठेही असला तरी त्याला हुडकून काढू, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे या जळक्या प्रवृत्तीच्या इसमाला कपाशीची झाडे उपटून फेकणे चांगलेच महागात पडणार आहे.
————