उत्खननात सापडलेल्या श्रीहरी विष्णूमूर्तीचे सिंदखेडराजातच जतन व्हावे; अन्यथा जनआंदोलन उभारणार!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळ परिसरात उत्खननात आढळून आलेल्या शेषशायी विष्णूमूर्तीचा हा अनमोल ठेवा सिंदखेडराजा येथेच जतन करून संवर्धन व्हावे, अशी मागणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराजे जाधव यांनी केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळाच्या परिसरात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून उत्खनन केले जात आहे. सदर उत्खनन खोदकाम हे सीसीटीव्ही कॅमेर्याच्या निगराणीत करण्याची मागणीदेखील जाधव यांनी केली आहे. सदर उत्खननात अनेक प्राचीन वस्तू निघण्याची शक्यता आहे. मागील काळात शिवमंदिराचा ढांचा आढळून आला. त्यात अखंड शिवलिंग स्थापित आहे. त्यामुळे केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून या परिसरात अधिकचे उत्खनन सुरू असताना शेषशायी विष्णूची लक्ष्मीसोबत असलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आढळून आली. मूर्तीचे वय अठराशेपेक्षा जास्त असावे, असा अंदाज आहे. या मूर्तीचे सिंदखेडराजा येथेच जतन व संवर्धन व्हावे, ही मूर्ती इतरत्र हलवली जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे ही मूर्ती शहरात सुरक्षित ठेवावी, अन्यथा छावा संघटनेच्यावतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केलेले आहे.
————