Breaking newsHead linesMaharashtraPachhim Maharashtra

आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले; एकजण जागीच ठार!

– एकलहरे गावाजवळ कार व दुचाकीची समोरासमोर धडक

पुणे (विशेष प्रतिनिधी) – पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला असून, यात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. कार आणि दुचाकीची समोरासमोर धकड होऊन हा अपघात झाला. भीषण अपघातात कारमधील चालक हा खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या असल्याची माहिती समोर येत आहे. याचसंदर्भात आमदार दिलीप मोहिते पाटलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ‘अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, त्याने मद्यपानही केलेले नव्हते’, असा दावा आमदार दिलीप मोहितेंनी केला आहे.  दुसरीकडे, आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्याने अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्याने मद्यप्राशन केले होते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

अपघातानंतरचा हा व्हिडिओ आहे. रात्र असल्याने रस्त्यावर फारसे लोक नव्हते.

पोलिसांत दाखल तक्रारीची प्रत.

सविस्तर असे, की पुणे – नाशिक महामार्गावर एकलहरे गावाजवळ हा अपघात घडला. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याच्या कारने दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर मयुर मोहिते हा कारमध्येच बसून होता. तर या अपघातात दुचाकीवरून जाणार्‍या ओम भालेराव या (वय.१९ वर्षे ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. कार विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीला धडकली. दोन्ही गाड्यांची धडक इतकी भीषण होती की एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. कारने दोघांना चिरडल्यानंतर मयूर मोहिते हा कारमध्येच बसून होता. रस्त्यावरून जाणार्‍या दुसर्‍या एका कारच्या डॅशकॅममध्ये मयूर मोहिते कारमध्ये बसल्याचे रेकॉर्ड झाले आहे. स्थानिक नागरिक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मयूरला गाडीतून बाहेर काढले. अपघातानंतर ओम भालेरावच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुचाकीस्वार तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंचर पोलिसात आमदार पुतण्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर मंचर पोलीस स्टेशनला तणापूर्ण परिस्थिती होती.


धडक इतकी भीषण की दुचाकी हवेत उडाली!

जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर मोहिते असे आमदार मोहिते यांच्या पुतण्याचे नाव आहे. आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत होता. तो विरुद्ध दिशेने सुसाट कार चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना कारने धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकीस्वार हवेत उडाली. त्यानंतर डोक्याला मार लागल्याने अपघातात ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मयुर हा कारमध्येच बसून होता. त्याने जखमींना मदत देखील केली नसल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. अपघातानंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी मंचर पोलिस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी त्यांना शांततेचे आवाहन केले.


“माझा पुतण्या आयुष्यात कधीही दारू प्यायलेला नाही, तो दारू पित नाही. तो इंजिनिअर आहे, तो दारू पित नाही. तो उद्योजकदेखील आहे. त्यामुळे असले प्रकार त्यानं त्याच्या आयुष्यात केलेले नाहीत.”, असे आमदार दिलीपसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. तसेच अपघात झाला त्या ठिकाणी कुणीच नव्हते. त्यामुळे प्रथमदर्शनी चूक नेमकी कुणाची? हे अजून पोलिसांनी मला सांगितलेले नाही. पोलीस ज्यावेळी माहिती देतील, त्यावेळी मी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल, असे मोहिते पाटील म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!