‘लोकमत’च्या ‘लोकनेता अॅवॉर्ड’ने इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर सन्मानीत
अकोला (विठ्ठल महाले पाटील) – बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील इसरूळ गावात विविध लोकाभिमुख विकासकामे उभे करून प्रगतीपथावर नेणारे लोकप्रिय सरपंच तथा तालुका सरपंच संघटनेच्या माध्यमातून सरपंचांच्या हक्कासाठी लढणारे नेतृत्व सतिश पाटील भुतेकर यांना दैनिक लोकमतच्यावतीने ‘लोकनेता अॅवॉर्ड’ने सन्मानीत करण्यात आले आहे.
अकोला येथील हॉटेल व्ही एस इम्पेरिअल येथे शुक्रवारी (दि.२१) पार पडलेल्या शानदार सोहळ्यात आपल्या कार्यकर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे सरपंच सतिश पाटील भुतेकर यांचा हा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे, आमदार अमोल मिटकरी, सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद, ‘लोकमत’चे युनीट हेड अलोककुमार वर्मा, अकोला आवृत्तीचे संपादक किरण अग्रवाल यांची याप्रसंगी उपस्थिती होती. सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनी अतिशय चुरशीच्या लढतीत इसरूळ ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व निर्माण केले होते. त्यानंतर त्यांनी विकासकामांचा अक्षरशः झपाटा लावला. एवढेच नाही तर परिसरातील विविध विकासकामांसाठीही ते राज्य सरकार दरबारी नेतृत्व करत आहेत.
चिखली तालुका सरपंच संघटनेचे ते अध्यक्ष असल्याने सरपंचांच्या विविध न्यायहक्कासाठीही ते लढा देत आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, ज्येष्ठ नेते तथा शिक्षणमहर्षी शेणफडराव घुबे, ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूपचे मुख्य संपादक पुरूषोत्तम सांगळे, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे विदर्भ विभाग संपादक बाळू वानखेडे, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ आदींनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.
———————-