‘सगेसोयर्या’ची अमलबजावणी करा; सरकारला महिनाभराची मुदत देत जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित!
– सरकारने मागण्या मान्य न केल्यास विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडणार – जरांगे पाटलांचा इशारा
– ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीतच घेतले ताब्यात, आंतरवाली सराटीत जाण्यापासून रोखले!
छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि.१३) सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. तसेच सगेसोयर्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या एका महिन्यात सरकारने मागण्या मान्य न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू, असा इशारादेखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके हे आंतरवाली सराटी येथे उपोषण करण्यास जात होते. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर हाके यांच्या लोकेशनची माहिती घेऊन त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, रात्रीतच हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले गेल्याने आंतरवाली सराटी येथील संभाव्य संघर्ष टळला आहे.
राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यात आंतरवाली सराटी येथे वाटाघाटी झाल्या. यावेळी मनोज जरांगे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. मात्र ३० जूनपूर्वी हा विषय धसास लावा, अशी सूचना केली. दरम्यान, सरकारच्यावतीने १ महिन्याचा कालावधी देण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मंत्री शंभूराज देसाई, राणा जगजितसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आंतरवाली सराटी येथे पोहोचत, मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत सरकार कशा पद्धतीने काम करत आहे, याबाबतची माहिती त्यांनी जरांगे यांना दिली. ‘सगेसोयर्यांची अंमलबजावणीसाठी सरकार दिरंगाई करत आहे, असा गैरसमज मनोज जरांगेंनी यांनी करू घेऊ नये, त्यांनी हा विचार डोक्यातून काढून टाकावा’, असे यावेळी शंभूराज देसाई यांनी सांगितले. ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवू, यावर येणार्या हरकती या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवल्या जातील’, असे शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले. तसेच ‘मागील दोन महिने राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय घेण्यास विलंब झाला. मात्र, यासंदर्भात मी उद्या अधिकार्यांची बैठक घेणार आहे. सगेसोयर्यांच्या नियमांची अधिसूचना काढण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल’, असे आश्वासनही त्यांनी मनोज जरांगे यांना दिले. देसाई यांच्या आश्वासनानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले असून, त्यांनी राज्य सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. तसेच १३ जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास, आगामी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू, असा इशारादेखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
———–
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (गुरूवार) सहावा दिवस होता. बुधवारी मध्यरात्री बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्व खासदारांना एकत्र करणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला. खा. सोनवणे यांनी मनोज जरांगे यांची दुसर्यांदा भेट घेतली. पहिली भेट बीड लोकसभा जिंकल्यानंतर घेतली होती. बुधवारी मध्यरात्री झालेल्या भेटीनंतर सोनवणे यांनी, राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचे सांगून सर्व खासदारांना एकत्रित करणार असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी सरकारकडे करणार आहे. दरम्यान, धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची कार मराठा आंदोलकांनी बुधवारी अडवली. मराठा आरक्षणासंदर्भात संसदेमध्ये नुसते विषय मांडू नका, सभागृह बंद पाडा, अशी मागणी आंदोलकांनी त्यांच्याकडे केली. जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनीदेखील मनोज जरांगे यांची भेट घेतली.
———–