– केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी घेतले संत गजाननांचे दर्शन; पालखी सोहळ्यातही सहभाग
शेगाव (तालुका प्रतिनिधी) – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने आज (दि.१३) सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान केले. तब्बल सातशे वारकर्यांना घेऊन ही पायीदिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात शेगावची ही वारी मजल दर मजल करत ३३ दिवसांचा पायी प्रवास करत आषाढ महोत्सवासाठी विठुरायाच्या पंढरपुरात दाखल होणार आहे. त्यासाठी श्री संत गजानन महाराज संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पालखीमध्येही ते सहभागी झाले.
पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा १५ जुलैरोजी पोहोचणार आहे. सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूर येथे जात असते. यंदाही पालखीचे शेगाव येथून पंढरपूरसाठी प्रस्थान झाले. यंदा दिंडीचे हे ५५ वे वर्ष आहे. जवळपास ७०० वारकर्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचे आज सकाळी झाले. या दिंडीत ७०० वारकरी, २५० पताकाधारी २५० टाळकरी २०० सेवेकरी असा मोठा ताफा आहे. पुढील एक महिना दोन दिवस पायी प्रवास करून १५ जुलैरोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहेत. आषाढी सोहळा संपल्यावर पालखी २१ जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघून ११ ऑगस्ट रोजी शेगावात पोहोचेल. आज सकाळी पालखी प्रस्थान सोहळ्याला नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती होती. त्यांनी पहाटेच संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. गण गण गणात बोतेच्या गजरात व हजारो भक्तांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा पार पडला.