सेवानिवृत्त जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांचा सोमवारी मिसाळवाडी येथे नागरी सत्कार
चिखली (महेंद्र हिवाळे) – बुलढाणा जिल्हा कोषागार अधिकारी पदावरून ३१ मेरोजी सेवानिवृत्त झालेले दिनकर बावस्कर यांचा त्याच्या मूळगावी मिसाळवाडी येथे नागरी सत्कार सोहळ्याचे ग्रामस्थ तथा नागरी सत्कार सोहळा समितीच्यावतीने आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्य सरकारचे सहसचिव तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच, अकोल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. शरद जावळे, जळगावचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास प्रकल्पाचे संचालक राजेंद्र लोखंडे, बुलढाणा कारागृहाचे अधीक्षक संदीप भुतेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल अकाळ, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आशीष वाघ, जानकीदेवी शिक्षण संस्था देऊळगाव घुबेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी शेणफडराव घुबे, माजी कोषागार अधिकारी प्रल्हाद ताठे, उद्योजक तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप’चे मुख्य संपादक पुरूषोत्तम सांगळे, उद्योजक बळीराम मिसाळ पाटील, उद्योजक प्रताप मिसाळ यांचीही या सोहळ्यास प्रामुख्याने उपस्थिती लाभणार असल्याची माहिती नागरी सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष तथा मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील यांनी दिली.
अतिशय कठीण परिस्थितीतून संघर्ष करत, मिसाळवाडीसारख्या एका छोट्या खेड्यातून दोनवेळा राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होत, दिनकर बावस्कर यांनी जिल्हा कोषागार अधिकारी या महत्वाच्या पदापर्यंत मजल मारली होती. पहिली ते चौथीपर्यंतचे त्यांचे प्राथमिक शिक्षण मिसाळवाडी येथेच झाले. पाचवी ते सातवीपर्यंत त्यांना शेजारील शेळगाव आटोळ येथे शिक्षणासाठी पायपीट करावी लागली. तर चिखली येथील शिवाजी हायस्कूल येथून त्यांनी नववी ते बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल्याच्या कृषी महाविद्यालयातून त्यांनी बीएसस्सी (फॉरेस्ट्री) ही पदवी प्राप्त केली. कृषी शाखेतील पदवी हाती येताच त्यांची परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामसेवक म्हणून निवड झाली. १९९५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली व ते विक्रीकर निरीक्षक म्हणून शासन सेवेत रूजू झाले. नागपूर येथे त्यांनी विक्रीकर निरीक्षक म्हणून काम पाहिले. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी पुन्हा एमपीएससी देऊन ही परीक्षा उत्तीर्ण होत, अतिरिक्त जिल्हा कोषागार अधिकारी हे महत्वपूर्ण पद प्राप्त केले. २००० साली ते अप्पर कोषागार अधिकारी पदावर रूजू झाले. पुढे त्यांची शासनाने जिल्हा कोषागार अधिकारी पदावर पदोन्नती केली. अकोला महापालिका येथे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, बुलढाणा येथे जिल्हा कोषागार अधिकारी व शेवटच्या काही कालावधीत ते सहाय्यक संचालक (वित्त व लेखा) या वित्त विभागातील महत्वाच्या पदावरदेखील कार्यरत होते. तब्बल ३१ वर्षांच्या शासकीय सेवेत त्यांनी आपली निष्कलंक सेवा तर पूर्ण केलीच; परंतु मनमिळावू स्वभाव, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती, यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येकासाठी ते वित्त विभाग व प्रशासनातील विविध विभागातील सहाय्यासाठी हक्काचे दुवा होते. मिसाळवाडी गावाने अनेक क्षेत्रात मान्यवर दिले असून, दिनकर बावस्कर यांच्यामुळे गावाचा लौकिक तर वाढलेला आहेच, पण त्यांच्यापासून गावातील नवपिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी ग्रामस्थांनी त्यांचा सपत्नीक सत्कार ठेवला असल्याची माहिती सरपंच तथा नागरी सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष विनोद तथा बाळू पाटील यांनी दिलेली आहे. हा कार्यक्रम छोटेखानी असला तरी, गावासाठी प्रेरणादायी आहे, असेही ते म्हणाले.
मिसाळवाडी येथेच छोटेखानी आयोजित या कार्यक्रमास राज्य सरकारचे सहसचिव तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच, चिखली तालुक्यातील मूळचे कोनड येथील असलेले व सद्या अकोला येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ. शरद जावळे, बुलढाणा येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राहिलेले व सद्या जळगाव येथे ग्रामीण विकास प्रकल्पाचे संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असलेले राजेंद्र लोखंडे, मूळचे इसरूळ येथील असलेले व सद्या बुलढाणा कारागृहाचे अधीक्षक असलेले संदीप भुतेकर पाटील, बुलढाणा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल अकाळ, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आशीष वाघ, जानकीदेवी शिक्षण संस्था देऊळगाव घुबेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी शेणफडराव घुबे, बुलढाण्याचे माजी जिल्हा कोषागार अधिकारी प्रल्हाद ताठे, उद्योजक तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप’चे मुख्य संपादक, राज्यातील वरिष्ठ पत्रकार पुरूषोत्तम सांगळे, मुंबई येथील रसायनिक उद्योगातील प्रमुख उद्योजक बळीराम मिसाळ पाटील, उद्योजक प्रताप मिसाळ यांचीही या सोहळ्यास प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे, असेही सरपंच तथा सत्कार समितीचे अध्यक्ष बाळू पाटील यांनी सांगितले.
—————-