सिंदखेडराजा तहसीलदारांकडून निमगाव वायाळच्या सरपंचांना रेतीघाटाच्या मोजणीचा अहवाल देण्यास टाळाटाळ!
– वाळूचोरीचे पाणी जिरते कुठे? अहवाल सार्वजनिक करण्यास तहसीलदारांना अडचण काय?
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील मौजे निमगाव वायाळ येथील शासकीय रेतीघाट लिलाव क्षेत्रात मोजमाप करण्यासाठी निमगाव वायाळच्या महिला सरपंच सौ. शीलाताई रामेश्वर चाटे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर एकदाचे मोजमाप करण्यात आले. मात्र सदर मोजमाप अहवालात महसूल विभागाचे अनेक कर्मचारी गोत्यात येणार असल्याने व स्वतः हे प्रकरण अंगलट येते का? या भीतीने सिंदखेडराजाचे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी अद्याप मोजमाप अहवाल देण्यास टाळाटाळ चालविल्याचा आरोप निमगाव वायाळच्या सरपंच सौ.शीलाताई चाटे यांनी केला आहे. हा अहवाल देण्यास तहसीलदारांना काय अडचण आहे? अवैध वाळूचोरीचे पाणी जिरते कुठे? असे प्रश्न यानिमित्ताने चव्हाट्यावर आले आहेत.
निमगाव वायाळ येथील शासकीय रेती घाटातील क्षेत्रात लाखो ब्रास अवैध रेती उत्खनन झाले असून, सदर रेतीघाटातील अवैध वाळूचोरीचे मोजमाप करून दोषीं अधिकार्यांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी वारंवार अर्ज, निवेदन देऊन मोजमाप झाले नसल्याने अखेर महिला सरपंचांनी दिनांक २७ मेंरोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यासाठी महसूल विभागाने जंगजंग पछाडले होते. तरीदेखील या सरपंच माघार घेत नसल्याने लोकसभा निकालाचे कारण देत, २७ मे रोजीचे आत्मदहन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. त्यामुळे सरपंचांनी आपले आंदोलन १ जूनपर्यंत स्थगित केल्याने अखेर महसूल विभागाच्या हे प्रकरण अंगलट येणार असल्याने खुद्द जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी स्वतः सदर रेती घाटाची पाहणी केली. यावेळी या परिसरात दोन हजार दोनशे ब्रास रेतीचे साठे जप्त करण्याची सर्वात मोठी कारवाई केली गेली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी दोषी कर्मचारी यांच्यावर कारवाईचे आदेश दिले असतानाही प्रभारी उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित कर्मचार्यास फक्त शो-कॉज नोटीस दिली. पुढे काहीही कारवाई झाली नाही. मात्र या कारवाईत मोठे गौडबंगाल झाल्याची चर्चा परिसरात जोर धरीत आहे.
दिनांक ३० मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आढाव यांच्या नियंत्रणात अखेर निमगाव वायाळ येथील शासकीय रेतीघाटाचे एकदाचे मोजमाप करण्यात आले. सदर मोजमाप अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने सिंदखेडराजा तहसीलदार व उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांना ३ जूनरोजी सादर केलेला आहे. मात्र सदर अहवालात अनेक उच्च महसूल अधिकारी व स्वतः तहसीलदार गोत्यात येण्याची शक्यता असल्याने हा अहवाल महिला सरपंच यांना देण्यास टाळाटाळ सुरू आहे. तसा आरोपदेखील सरपंचांनी केलेला आहे. तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यातील अवैध रेतीतस्करांना सोन्याचे दिवस आले असून, तालुक्यातील काही तस्कर खुलेआम रेतीचे रात्रंदिवस उत्खनन करीत आहे. तसेच त्यांनी जप्त केलेले रेती साठे त्याच तस्करांना वाटप करून रेतीसाठ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे योगदान तहसीलदारांनी दिलेले आहे. पाऊस पडून पावसाच्या पाण्याने नदीला आलेल्या पुराने हे खड्डे भरल्यास त्या अहवालात गोंधळ करून वाचता येईल, यासाठी हा अहवाल आपल्याला दिला जात नाही, असा आरोपही सरपंच सौ. शीलाताई चाटे यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना तहसीलदारांवर केलेला आहे.
————