खा. प्रतापराव जाधवांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी; नरेंद्र मोदींकडून चहापानाचे निमंत्रण!
– हा सर्वसामान्य शिवसैनिकाला मिळालेला न्याय : प्रतापराव जाधव
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे वृत्त ठरले तंतोतंत खरे!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा लोकसभेतून चौथ्यांदा निवडून आलेले महायुतीचे ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचे जवळपास निश्चित झाले असून, तसा फोन प्रधानमंत्री कार्यालयाकडून त्यांना आल्याची माहिती मिळाली आहे. त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची माहिती मिळताच जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह संचारला आहे. हा सर्वसामान्यांचा विजय असून, यानिमित्ताने सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय मिळाल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज (दि.९) दिल्लीत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे, कालच ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने या संदर्भात सविस्तर वृत्त प्रसारित करून खा. जाधव यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचे नमूद केले होते. दरम्यान, प्रतापराव जाधव यांच्याकडे स्वतंत्र पदभार मंत्रिपद दिले जाणार असल्याची राजधानीत चर्चा असून, या मंत्रिपदाचा संबंध व संपर्क हा थेट पंतप्रधान कार्यालयाशी असतो. यापूर्वी हा मान महाराष्ट्रातून प्रफुल्ल पटेलांना मिळालेला होता.
लोकसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या झालेल्या तिहेरी लढतीत बुलढाणा मतदारसंघातून खासदार प्रतापराव जाधव यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे तीनदा नेतृत्व केलेले असून, काही काळ राज्यमंत्रा पदाची जबाबदारी ही सांभाळली आहे. सलग चौथ्यांदा लोकसभेवर निवडून आल्याने त्यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठता व मेरिट बेसीवर खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानिमित्ताने सामान्य शिवसैनिकाला न्याय दिल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. हा सर्वसामान्यांचा विजय असून, सामान्य शिवसैनिकाला न्याय मिळाला असल्याच्या भावना खा. प्रतापराव जाधव यांनी आज दिल्लीत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्यात.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार्या खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून फोन गेले आहेत. आज सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी राष्ट्रपती भवनात हा शपथविधी पार पडणार असून, नरेंद्र मोदी हे तिसर्यांना पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रीय शहीद स्मारकात जाऊन शहिदांना वंदनही केले. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला श्रीलंका, बागलादेश, मालदीव, सेशेल्स, मॉरिसस, नेपाळ व भूतान या शेजारी राष्ट्रांचे प्रमुखदेखील आलेले असून, तेदेखील सायंकाळी या सोहळ्यास हजर राहणार आहेत.
खासदार प्रतापराव जाधव हे आज नरेंद्र मोदींसह मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांना नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी चहासाठी आमंत्रणदेखील मिळालेले होते. १९९७ नंतर तब्बल २२ वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रातील मंत्रिपद मिळत असून, त्यांना कोणते खाते मिळणार याबाबत आता उत्सुकता लागून आहे. आज सायंकाळी ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर प्रतापराव जाधव एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे होते. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली. १९९० पासून ते राजकारणात सक्रीय आहेत. पंचायत समिती सदस्य, आमदार, राज्यात क्रीडा मंत्री, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा प्रतापराव जाधवांचा प्रवास राहत आला आहे. त्यांनी अनेक संसदीय समितीत सदस्य म्हणून काम पाहिलेले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विदर्भात एकमेव जागा मिळवत बुलढाण्याचा गड प्रतापराव जाधव यांनी राखला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दोन शिवसैनिकांच्या लढतीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आणि शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा पराभव करत प्रतापराव जाधव यांनी विजय मिळवला आहे. या विजयाचे बक्षीस प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाच्या रुपाने मिळत आहे. २५ नोव्हेंर १९६० रोजी प्रतापराव जाधव यांचा मेहकर तालुक्यातील मादणी येथे जन्म झाला. सुरुवातीपासून त्यांना राजकारण आणि समाजकारणात रुची होती. त्यांचा विवाह १ एप्रिल १९८३ रोजी राजश्री यांच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. बुलढाणा, चिखलीतील शिवाजी कॉलेज येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे शिक्षण बीएपर्यंत झालेले आहे.
– प्रतापराव जाधवांचा राजकीय परिचय –
– १९९०-१९९५ – सभापती, मेहकर तालुका खरेदी विक्री समिती मेहकर
– १९९२-९५ – पंचायत समिती सदस्य
– १९९२-१९९६ – सभापती मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती
– १९९५-२०१५ – संचालक, जिल्हा सहकारी बँक बुलढाणा
– २०१०-२०१५ – उपाध्यक्ष, जिल्हा सहकारी बँक, बुलढाणा
– १९९५-२००९ – सदस्य महाराष्ट्र विधानसभा (तीन वेळा,१५ वर्ष)
– १९९७-१९९९ – क्रीडा मंत्री, युवा कल्याण आणि सिंचन राज्य मंत्री, महाराष्ट्र सरकार
– २००९ – पहिल्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहचले.
– २००९ – उद्योग समितीचे सदस्य
– २०१४ – दुसर्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहचले.
– २०१४-२०१८ – सदस्य, सल्लागार समिती, खाद्य प्रंस्कारण उद्योग मंत्रालय, सदस्य, अर्थ संबधित स्थायी समिती
– १२ डिसेंबर २०१४ – ८ जानेवारी २०१८ – सदस्य, इतर मागासवर्ग कल्याण समिती
– २०१९ – तिसर्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहोचले.
– २०१९-२०२४ – हाऊस समितीचे सदस्य
– २०१९ ते २०२२ – सभापती ग्रामीण विकास आणि पंचायतीराज स्थायी समिती
– २०१९-२०२४ – सदस्य संसदीय राजभाषा समिती
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णीसाठी राज्यातील सहा खासदारांना ‘पीएमओ’तून फोन!