– शेजारील राष्ट्रांचे अध्यक्ष, पंतप्रधानही शपथविधी सोहळ्यास येणार!
– भाजपसह सहयोगी पक्षाचे १८ खासदार कॅबिनेट; राज्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे नेते नरेंद्र मोदी हे रविवारी (दि.९) सायंकाळी ७.१५ मिनिटांनी पंतप्रधानपदासाठी पद व गोपनीयतेची शपथ घेत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशाचे तिसर्यांदा पंतप्रधान होणारे ते एकमेव नेते ठरले आहेत. फरक फक्त एवढाच आहे, की पंडित नेहरू हे बहुमताने सिंगल लार्जेस्ट पार्टी घेऊन सत्तेवर आले होते, तर मोदी हे बहुमताअभावी 14 राजकीय पक्षांना सोबत घेऊन सत्तेवर येत आहेत. मोदी यांच्यासोबत एनडीएतील घटक राजकीय पक्षांचे १८ खासदारदेखील मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यात ७ कॅबिनेट व ११ स्वतंत्र प्रभार अथवा राज्यमंत्री यांचा समावेश राहणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तेलुगू देसम आणि संयुक्त जनता दल यांच्याकडून चार (२ कॅबिनेट), शिंदेंच्या शिवसेनेचा एक खासदार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेईल. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे नवी दिल्लीत पोहोचले असून, त्यांचा एखादवेळेस उद्या शपथविधी होऊ शकतो. त्यांना तयार राहण्यास सांगितले असून, दुपारपर्यंत त्यांना निराेप येऊ शकताे, असे सूत्राने सांगितले.
संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळासंदर्भात भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह व राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नितीशकुमार व चंद्रबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर तीन डझन नावांची यादी फायनल झाली आहे. उद्याच्या शपथविधी सोहळ्यात १८ खासदार मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, लोकजनशक्ती पक्ष यांचा प्रत्येकी एक खासदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतो, असेही सूत्राने सांगितले. दरम्यान, जनता दल संयुक्तचे खासदार के सी त्यागी यांनी मीडियाशी बोलताना सांगितले, की इंडिया आघाडीकडून नितीशकुमार यांना पंतप्रधान पदासाठी ऑफर आली होती. परंतु, त्यांनी ती नाकारली. त्यामुळे मंत्रिमंडळात आम्हाला सन्मानजनक जागा मिळणे अपेक्षित आहे.
कालच नरेंद्र मोदी यांना एनडीए आघाडीने आपला नेता निवडले होते. त्यानंतर मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा दाखल केला. तसेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना समर्थक खासदारांचे पत्रही सुपूर्त केले. राष्ट्रपतींनी त्यांना सरकार बनविण्यासाठी पाचारण केले असून, उद्या त्यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली जाणार आहे. त्यानंतर मोदींना संसदेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्यासह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नसून, भाजपच्या २४० जागा आहेत, तर एनडीए आघाडी मिळून २९३ खासदार निवडून आलेले आहेत. सरकार बनविण्यासाठी २७२ जागांची गरज असते. एकूण १४ राजकीय पक्षांना सोबत घेऊन नरेंद्र मोदी यांना आता मोदी नव्हे तर एनडीएचे कडेबोळाचे सरकार चालवावे लागणार आहे.
उद्या सायंकाळी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी पद व गोपनीयतेची राष्ट्रपतींकडून शपथ घेतील. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील मान्यवरही हजर राहणार आहेत. त्यासाठी राष्ट्रपती भवनाभोवतीची सुरक्षा वाढविण्यात आली असून, अर्धसैनिक दलाच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. तसेच, एनएसडी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर्सदेखील तैनात करण्यात आलेले आहेत. सर्व घडामोडींवर ५०० सीसीटीव्ही कॅमेर्यांची निगराणी राहणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी सात खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे शिंदे यांनी दोन कॅबिनेट मंत्रिपदे मागितली होती. परंतु, शिंदे यांना एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद देण्यास भाजप तयार झालेले आहे. त्यानुसार, कॅबिनेट मंत्रिपदासाठी शिंदे यांच्याकडून श्रीरंग बारणे (मावळ-पुणे), संदीपान भुमरे (छत्रपती संभाजीनगर) व प्रतापराव जाधव (बुलढाणा) यांची नावे पुढे करण्यात आलेली आहेत. पैकी प्रतापराव जाधव व संदीपान भुमरे यांना तयार राहण्यास सांगण्यात आले असल्याचे समजते. तसेच, घराणेशाहीचा आरोप लागू नये, यासाठी शिंदे यांनी त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद देण्यास नकार दिलेला आहे. दुसरीकडे, अजित पवार यांनीही एका कॅबिनेटची मागणी केलेली आहे. सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांची त्यावर वर्णी लागू शकते, असे सूत्राने स्पष्ट केलेले आहे.
———-