Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

मतदारांनी प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेला नाकारले!

– भाजपला फायदा होईल म्हणून दलित, ओबीसींनी वंचित आघाडीच्या उमेदवारांना मतदान टाळले – सूर

मुंबई (खास प्रतिनिधी) – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शानदार प्रदर्शन करणारी वंचित बहुजन आघाडी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र बॅकफूटवर गेली आहे. या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ३४ उमेदवार उभे केले होते. पैकी स्वतः प्रकाश आंबेडकर वगळता इतर ३३ उमेदवारांचे अक्षरशः डिपॉजिट जप्त झालेले आहे. आंबेडकरांना मतदान म्हणजे भाजपला फायदा, ही बाब लोकांच्या लक्षात आल्याने मतदारांनी वंचित आघाडीकडे पाठ फिरवली असल्याचा सूर राज्यात उमटत आहे. शिवाय, चारशे पारचा नारा देऊन, भाजप नेत्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली होती. त्यामुळे दलित, ओबीसी हा घटक बिथरला होता. आंबेडकरांना मतदान केले असते, तर महाआघाडीच्या जागा पडल्या असत्या, म्हणून मतदारांनी वंचित आघाडीला मतदान टाळले, असाही राजकीय सूर उमटत आहे. तर, आंबेडकरांनी या पराजयाबद्दल आत्मचिंतन करण्याची गरजही व्यक्त होत आहे. अर्थात, आंबेडकर हे सत्तेसाठी निवडणुका लढवत नाहीत, त्यांना चळवळ जीवंत ठेवायची असते. त्यासाठी ते दीर्घकालीन विचार करत असतात. तरीदेखील त्यांची भूमिका मतदारांनी नाकारल्याने त्यांनी याबाबत पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखीत होत आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना (ठाकरे) पक्षासोबत प्रकाश आंबेडकर यांनी युती केली होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू एकत्र आल्याबद्दल महाराष्ट्राला आनंदही झाला होता. परंतु, जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली, तसतशी आंबेडकर व वंचित आघाडीच्या नेत्यांची अटी व शर्तीची भाषा बदलू लागली. अखेरशेवटी आंबेडकर यांनी शिवसेना व महाआघाडीसोबतची युती तोडली व स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकार व भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल मराठी माणसांच्या मनात खदखद होती. त्यातच भाजपच्या नेत्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने चर्चेतील चेहरे देऊन व सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करूनही मतदारांनी वंचित आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे टाळले. वंचित आघाडीला मतदान केले तर महाआघाडीचे उमेदवार पडतील व त्याचा फायदा भाजपला होईल, अशी भीती मतदारांना होती. त्यामुळे राज्यात ३४ पैकी ३३ ठिकाणी वंचित आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झालेले आहे. स्वतः प्रकाश आंबेडकर हेदेखील अकोल्यातून मोठ्या फरकाने पराभूत झाले, तेथे ते तिसर्‍या क्रमांकावर फेकल्या गेल्याने अकोल्याच्या बालेकिल्ल्यात आंबेडकर चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून आले.


प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर.

राज्यात डिपॉझिट जप्त होणारे सर्वाधिक उमेदवार वंचित आघाडीचे आहेत. वंचित बहुजन आघाडीने एकूण ३४ उमेदवार रिंगणात उतरवले होते. यापैकी खुद्द प्रकाश आंबेडकर यांना पावणेतीन लाखांच्या घरात मते मिळाली असून, ते अकोला लोकसभा मतदारसंघात तिसर्‍या स्थानावर राहिले. खरी लढत भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसच्या अभय पाटलांमध्ये झाली. पण, आंबेडकरांना मिळालेल्या मतांचा अभय पाटलांना फटका बसल्याचे येथे दिसून येते. दुसरीकडे हिंगोलीत डॉ. बी. डी. चव्हाण यांना दीड लाखांच्या जवळपास मते घेता आली. पण, त्यांचेही डिपॉझिट जप्त झाले. पुण्यात वसंत मोरे, परभणीत पंजाबराव डख यासारखे नावाजलेले चेहरेही मोठ्या फरकाने पराभूत झाले आहेत. स्वतः प्रकाश आंबेडकरवगळता वंचित आघाडीच्या सगळ्या ३३ उमेदवारांचे डिप़ॉझिट जप्त झालेले आहे. त्यामुळे आंबेडकर यांनी आता तरी महाआघाडीसोबत जाऊन विधानसभेत मतांचे ध्रुवीकरण होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे, असा राजकीय सूर उमटत आहेत.


वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 34 जागांवर उमेदवार उभे केले होते, तर सात ठिकाणी इतरांना पाठिंबा दिला होता. पाठिंबा दिलेल्यांपैकी कोल्हापूर, नागपूर आणि बारामती अशा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाही समावेश होता.

– पाठिंबा दिलेले उमेदवार आणि त्यांचा निकाल –

– कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) – विजयी
– बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार) – विजयी
– सांगली – विशाल पाटील (अपक्ष) – विजयी
– नागपूर – विकास ठाकरे (काँग्रेस) – पराभूत
– भिवंडी – निलेश सांबरे (अपक्ष) – पराभूत
– अमरावती – आनंदराज आंबेडकर (रिपब्लिक सेना) – पराभूत
– यवतमाळ-वाशिम – डॉ. अनिल राठोड (एसजेपी) – पराभूत
याचाच अर्थ, वंचित आघाडीने पाठिंबा दिलेल्या सातपैकी तीन जागा विजयी झाल्या आहेत. तर उर्वरित पराभूत झाल्या आहेत.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!