प्रभारी नायब तहसीलदारांचे वाळूतस्करांना दणके; दोन दिवसांत दोन अवैध वाळू वाहनांवर कारवाया!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – अवघ्या चार दिवसांपूर्वी रूजू झालेले प्रभारी नायब तहसीलदार संदीप बंगाळे यांनी वाळूतस्करांविरोधात जोरदार मोहीम उघडली असून, दोनच दिवसांत वाळूचोरी करणार्या दोन वाहनांवर कारवाया केल्या आहेत. बंगाळे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वाळूतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीने कळस गाठला असून, सदर रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या नेतृत्वाखाली व तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील महसूल विभागाने फिरते गौणखनिज शोधपथक व बैठे पथक कारवाईसाठी तैनात केलेले आहे. प्रभारी नायब तहसीलदार संदीप बंगाळे यांनी चारच दिवसांपूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसांत दोन अवैध रेती वाहनांवर कारवाई करण्यात यश मिळवले असून, काल दुपारी पिंपळगाव कुडा येथील खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक होत असलयाची गुप्त माहिती प्राप्त होताच, महसूल कर्मचारी मतमोजणीसाठी बुलढाणा येथे गेलेले असताना, सोबतीला कार्यालयातील कोतवाल आकाश मघाडे यांना घेऊन पिंपळगाव कुडा येथे गेले असता, सचिन राठोड यांच्या मालकीचे विनानंबर ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करताना सापडले. यावेळी सदर ट्रॅक्टर चालकाकडे रेती वाहतूक परवाना नसल्याने सदर वाहन ताब्यात घेऊन किनगावराजा पोलिस ठाण्यात अटकाव करण्यात आले आहे. सदर वाहन ताब्यात घेण्यासाठी कोतवाल आकाश मघाडे व प्रभारी नायब तहसीलदार संदीप बंगाळे हे हजर होते. या कारवाईने रेतीतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
————-