BULDHANAHead linesPolitical NewsPolitics

‘प्रताप’गड पोखरला!; मेहकरात प्रा. खेडेकर व तुपकरांच्या ‘बरोबरी’त खा. जाधव!

– मुख्यमंत्री शिंदेंसोबत गेल्याची खदखद!; बुलढाणा, मेहकर विधानसभा मतदारसंघातच खा.जाधव माघारले!
– भाजप आमदार असलेल्या खामगाव व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघांनी बूज राखली!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचा काल, ४ जूनरोजी निकाल जाहीर झाला असता, खामगाव व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी यावेळीही प्रतापराव जाधव यांना विजयी केल्याचे दिसत आहे. बुलढाणा व चिखली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी आघाडी घेतली असून, सिंदखेडराजात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनाच मतदारांनी मोठी पसंती दिली आहे. ‘प्रतापगड’ म्हणून संबोधल्या जाणार्‍या मेहकर विधानसभा मतदारसंघात मात्र प्रा. नरेंद्र खेडेकर व रविकांत तुपकर हे प्रतापराव जाधवांच्या बरोबरीत सुटले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर खा. जाधव हे शिंदेंसोबत गेल्याची खदखद त्यांच्याविषयी पाहायला मिळत होती. शिंदे गटाचे आमदार असलेल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातही खा. जाधव मायनस असून, मेहकरातही शिंदे गटाचा आमदार असताना अवघ्या २७३ मतांची नगण्य आघाडी मिळाली आहे. त्यामुळे बुलढाणा व मेहकरात प्रतापरावांना लीड का मिळाला नाही, याचे त्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
प्रतापराव जाधव यांची विजयी मिरवणूक.
तुपकरांनी मानले मतदारांचे आभार.

बुलढाणा लोकसभेसाठी ४ जूनरोजी मतमोजणी पार पडली. यामध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे तीस हजाराच्या आसपास मतांनी विजयी झाले आहेत. यामध्ये आता विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण मतांचा आकडा समोर आला असून, प्रतापराव जाधव यांना भाजपचे आमदार असलेल्या संजय कुटे यांच्या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात ७५ हजार ४८३ मते मिळालेली आहेत. त्यामुळे तेथे १३ हजार ९९३ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघातून ७५ हजार ३८२ मते मिळाली असून, २० हजार २८६ मतांचे येथून मताधिक्य आहे. हा मतदारसंघ भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांचा आहे. याच जळगाव जामोद मतदारसंघातून प्रा. नरेंद्र खेडेकर यांना ६१ हजार ४९१ तर खामगाव मतदारसंघातून ५५ हजार ९६ मते मिळाली आहेत. तर, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जळगाव जामोद मतदारसंघातून १४ हजार २४२ तर खामगाव मतदारसंघातून २० हजार ९९७ मते मिळाली आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून प्रा. नरेंद्र खेडेकर यांना ४९ हजार ६५७ मते मिळाली असून, येथे २२५५ मतांचा तर चिखली विधानसभा मतदारसंघातून ६१ हजार १६४ मते मिळाली असून, येथून ११ हजार ९२० मतांचा प्रा. खेडेकर यांना लीड मिळाला आहे. खा. जाधव यांना चिखली मतदारसंघातून ४९ हजार २४४ तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून ४७ हजार ४०२ मते मिळाली आहेत. रविकांत तुपकर यांना चिखली विधानसभा मतदारसंघात ४४ हजार ५१५, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून ३८ हजार ८६४ मते मिळाली आहेत. महायुतीतील अजित पवार गटाचे डॉ. राजेंद्र शिंगणे आमदार असलेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना ७४ हजार ७५३ एवढे मते मिळाली असून, येथून २९ हजार ९८९ मतांचे मताधिक्य मिळालेले आहे. येथून खासदार प्रतापराव जाधव यांना ४४ हजार ७६४ तर महा विकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांना ३६ हजार २६६ मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात खा.जाधव हे पिछाडीवर असून, स्वत:चे होमग्राऊंड असलेल्या व डॉ.संजय रायमुलकर आमदार असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघातूनही अवघा २७३ मतांचा नाममात्र लीड प्राप्त झालेला आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघात खा. जाधव यांना ५६ हजार ०१६, नरेंद्र खेडेकर यांना ५५ हजार ७४१ व रविकांत तुपकर यांना ५५ हजार ६७२ मते मिळाली.प्रतापराव जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेल्याचा संताप मतदारांनी मतदानातून व्यक्त केला असल्याचे दिसत आहे. तसेच, ही बाब संजय गायकवाड व संजय रायमुलकर या दोन संजयांसाठी धोक्याची घंटाही आहे. भाजपच्या आमदार असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघात खा. जाधव मायनस असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी एकदिलाने भिडल्याने मेहकरात प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी चांगली मते घेतली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोणतीही ताकद नसताना अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनांच्या भरवशावर ५५ हजारांच्यावर मते मिळवलेली आहेत. या सर्व घडामोडींचा निश्चितच आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा परिणाम पडणार असल्याचे दृष्टीपथास येत आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतांची गोळाबेरीज पाहिली असता, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, संजय रायमुलकर व भाजपच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांची सीट धोक्यात दिसून येत आहे.


लोकसभेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान

  • – प्रतापराव जाधव (शिंदे गट)
  • बुलढाणा – ४७,४०२
    चिखली – ४९,२४४
    सिंदखेडराजा – ४४,७६४
    मेहकर – ५६,०१४ (लीड २७३)
    खामगाव – ७५,३८२ (लीड २०२८६)
    जळगाव जामोद – ७५,४८३ (लीड १३९९२)
    – एकूण मतदान पोस्टलसह – ३,४९,८६७
  • – प्रा. नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट)
  • बुलढाणा – ४९,६५७ (लीड २२५५)
    चिखली – ६११६४ (लीड ११९२०)
    सिंदखेडराजा – ३६,२६६
    मेहकर – ५५,७४१
    खामगाव – ५५,०९६
    जळगाव जामोद – ६१,४९१
    – एकूण मतदान पोस्टलसह ३,१९,४१५
  • – शेतकरी नेते रविकांत तुपकर –
  • बुलढाणा – ३८,८६४
    चिखली – ४४,५१५
    सिंदखेडराजा – ७४,७५३ (लीड २९९८९)
    मेहकर – ५५,६७२
    खामगाव – २०,९९७
    जळगाव जामोद – १४,२४१
    – एकूण मतदान पोस्टलसह – २,४९,०४२
    ———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!