Breaking newsHead linesPolitical NewsPoliticsWorld update

लोकसभा बरखास्त, नरेंद्र मोदी काळजीवाहू पंतप्रधान!

– NDA बैठकीला १६ पक्षांचे २१ नेते हजर, मोदींच्या नेतृत्वात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता
– काँग्रेस अध्यक्ष खारगेंच्या निवासस्थानी ‘इंडिया आघाडी’ची बैठक; केंद्रात सरकार स्थापण्यासाठी रणनीतीवर चर्चा

नवी दिल्ली (आवेश तिवारी) – मावळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस करत १७ वी लोकसभा विसर्जीत करण्याची विनंती केली. त्यानुसार, राष्ट्रपतींनी मोदींच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त केले असून, लोकसभाही विसर्जीत केली आहे. पुढील पंतप्रधान निवडला जाईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहण्याची सूचना मोदींना केली आहे. दरम्यान, केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला असून, सायंकाळी ४ वाजता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ची बैठक झाली. तब्बल तासभर चाललेल्या या बैठकीत, नरेंद्र मोदी यांच्या एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला १६ पक्षांचे २१ नेते हजर होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. तथापि, त्यांच्यावतीने प्रफुल्ल पटेल हे हजर होते. सूत्रांच्या माहितीनुसार, घटक पक्षांच्या नेत्यांशी वाटाघाटी करण्याकरिता अमित शाह, राजनाथ सिंह व जेपी नड्डा हे प्रयत्न करणार असून, त्यानंतर ७ जूनरोजी नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींकडे सरकार स्थापन करण्याबाबत दावा दाखल करू शकतात.
इंडिया आघाडी बैठक, नवी दिल्ली.

दुसरीकडे, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह खा. सुप्रिया सुळे, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खा. संजय राऊत, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेशसिंह यादव, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, डीएमकेचे एम के स्टॅलीन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, आम आदमी पक्षाचे राघव चड्डा, व कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम युचेरी यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती होती. देशाने मोदींच्याविरोधात जनमत दिले असल्याने, या जनमताचा आदर करण्यासाठी पाऊले उचलण्यात यावी, असा सूर या बैठकीत निघाला. त्यादृष्टीने रणनीती आखण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली गेली असल्याचे सूत्राने सांगितले आहे.


काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी सांगितले, संविधानाचा सन्मान करणारे पक्ष आमच्यासोबत उभे ठाकलेले आहेत. मोदी आणि त्यांनी जे काही राजकारण केले त्याच्याविरोधातील जनादेश मिळालेला आहे. खर्‍याअर्थाने मोदी यांचा नैतिक पराभव झालेला आहे, अशी टीकाही खारगे यांनी केली. लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळालेल्या असून, बहुमतासाठी त्यांना ३२ जागा कमी पडत आहेत. परंतु, एनडीएकडे २९२ जागांचे बहुमत आहे. तथापि, चंद्रबाबू नायडू यांचे १६ खासदार व नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील जनता दलाचे १२ खासदार यांना सोबत घेऊन सरकार बनविण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्न करत आहेत.
————

नरेंद्र मोदी यांच्या एनडीएच्या नेतेपदी निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!