Breaking newsHead linesPolitical NewsPoliticsWorld update

मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ‘इंडिया आघाडी’ने कंबर कसली; मोदी आजच राष्ट्रपतींकडे जाण्याची शक्यता!

– ‘एनडीए’ व ‘इंडिया आघाडी’च्या आज दिल्लीत महत्वाच्या बैठका
– दिल्लीत राजकीय भूकंप घडविण्यासाठी शरद पवार, मल्लिकार्जुन खारगे कामाला लागले!

नवी दिल्ली (खास प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा देणारी भारतीय जनता पक्ष २७२ हा बहुमताचा जादुई आकडादेखील पार करू शकले नसले तरी, भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने २९१ जागा प्राप्त केल्या आहेत. तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कमालीची यशस्वी रणनीती आखणार्‍या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपला स्वबळावर बहुमतापासून दूर ठेवत, २३४ जागा पटकावल्या आहेत. एनडीएत फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असताना, ही फूट रोखण्यासाठी एनडीएचे नेते तथा मावळते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच (दि.६) राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा करू शकतात, असे राजकीय सूत्रांनी सांगितले. एनडीएतील सहभागी पक्षांची उद्यात नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी बैठक बोलावली असून, बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार व तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलेले आहे. दुसरीकडे, राष्ट्रपती भवनात शपथविधीची तयारीदेखील सुरू झाली होती. एकीकडे मोदी शक्य तितक्या लवकर पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी उतावीळ झालेले असताना इंडिया आघाडीनेदेखील मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. तसे संकेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे, शरद पवार यांनी दिले आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांचीदेखील उद्याच दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू हे जर इंडिया आघाडीसोबत आले तर मोदींचे पुन्हा पंतप्रधान बनण्याचे स्वप्न भंगू शकते.

लोकसभा निवडणुकीनंतर आता दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. एनडीएकडे बहुमत असले तरीदेखील इंडिया आघाडीचा सरकार स्थापनेचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक होईल. एनडीएत असलेले चंद्रबाबू नायडू हे दुपारी २ वाजता दिल्लीत पोहोचतील, तर नितीशकुमार देखील सकाळी ११ वाजता दिल्लीला रवाना होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेदेखील दिल्लीला जाणार आहेत. सर्वसामान्य माणसाने सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते दाखवून दिली आहे. सत्तेत असणारे कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना त्यांची जागा एका बोटाने दाखवून देऊ शकतो, हे या निवडणुकीत दिसून आले असल्याचे म्हणत, उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केलाच पाहिजे, असेदेखील ठाकरे यांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीसाठी मी दुपारनंतर जाणार असल्याची माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी दिली. छोटे घटक पक्ष आणि इतर अपक्षदेखील इंडिया आघाडीमध्ये एकत्र येतील आणि सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर होईल, असा दावादेखील उद्धव ठाकरे यांनी केला.

इतर घटक पक्षाच्या नेत्यांशी काँग्रेस आणि आमचे इतर पक्ष बोलत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. चंद्रबाबू नायडू यांनादेखील भारतीय जनता पक्षाने कमी त्रास दिलेला नाही. त्यामुळे ते नक्की विचार करतील, असा विश्वासदेखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्यातील खराब प्रदर्शनावर भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्देव असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. मात्र, निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू, असेही फडणवीस यांनी सांगितले.
तर, देशात ‘इंडिया’ आघाडीसाठी आशादायी चित्र दिसत असल्याचा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. विजयाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आपण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे आणि डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरी यांच्याशी चर्चा केली असल्याची माहितीदेखील पवार यांनी दिली. उद्या दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होईल, आणि त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याची माहितीदेखील शरद पवार यांनी दिली. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहाता, देशातील राजकीय समिकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे, त्याचे संकेतही शरद पवार यांनी दिले आहे.


या निवडणुकीत भाजपला २४१ जागा, काँग्रेसला ९९ जागा, समाजवादी पक्षाला ३७ जागा, तृणमूल काँग्रेसला २९ जागा, डीएमकेला २२ जागा, तेलुगू देसम पक्षाला १६ जागा, जनता दल (संयुक्त)ला १२ जागा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला ९ जागा, शिवसेना (शिंदे गटाला) ७ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ७ जागा, लोकजनशक्ती पक्षाला ५ जागा, वायएसआर काँग्रेसला ४ जागा, राष्ट्रीय जनता दलाला ४ जागा, कम्युनिस्ट पक्षाला ४ जागा, आम आदमी पक्षाला तीन जागा अशा जागा मिळालेल्या आहेत. एकूणच एनडीएला २९१, इंडिया आघाडीला २३४ व इतरांना १८ जागा मिळालेल्या आहेत. एनडीएतील नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू हे इंडिया आघाडीत आले तर नरेंद्र मोदी यांचे पुन्हा पंतप्रधान बनण्याचे स्वप्न भंगू शकते. त्यामुळे रात्रभरापासून नवी दिल्लीत जोरदार राजकीय खलबते सुरू आहेत.


बुलढाण्यात रविकांत तुपकरांचा जिव्हारी लागणारा पराभव; प्रतापराव जाधवांचा ‘चौकार’!

बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव गणपतराव जाधव यांना ३ लाख ४९ हजार ८६७ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार नरेंद्र दगडू खेडेकर यांना ३ लाख २० हजार ३८८ मते मिळाली. २९ हजार ४७९ मतांनी प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा विजयी झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याहस्ते श्री. जाधव यांना प्रमाणपत्र देण्यात आले. बुलढाणा लोकसभा निवडणुकीत दोन कट्टर शिवसैनिकांतच चुरशीची लढत झाली. त्यात शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना ३ लाख ४९ हजार ८६७ इतकी मते पडून त्यांचा २९ हजार ४७९ मतांची विजय झाला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांना ३ लाख २० हजार ३८८ इतकी मते पडली. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे प्रतापराव जाधवांच्या तुलनेत तब्बल ९९ हजार ९०४ मतांनी पराभूत झालेत, तुपकरांना २ लाख ४९ हजार ९६३ इतकी मते पडली. अपक्ष उमेदवार तथा शाहू परिवाराचे सर्वेसर्वा संदीप शेळके यांना अवघी १३ हजार ५० इतकी मते मिळातील. वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर बुलढाण्यात पूर्णपणे अपयशी ठरला असून, वंचित आघाडीचे वसंतराव मगर यांना ९८ हजार ४४१ इतकी मते मिळाली. रविकांत तुपकर यांचा पराभव जिल्हावासीयांच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे दिसून आले आहेत.


बुलढाण्यात उमेदवारांना मिळालेली मते अशी –

– प्रतापराव जाधव (शिवसेना) – ३ लाख ४९ हजार ८६७
– नरेंद्र खेडेकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) -३ लाख २० हजार ३८८
– वसंतराव मगर (वंचित बहुजन आघाडी) – ९८ हजार ४४१
– रविकांत तुपकर (अपक्ष) – २ लाख ४९ हजार ९६३
– संदीप शेळके (अपक्ष) – १३ हजार ०५०
– गौतम मघाडे (बहुजन समाज पार्टी) – ८ हजार २१८
– असलम शाह हसन शाह (महाराष्ट्र विकास आघाडी) – ६ हजार १५३
– मच्छिंद्र मघाडे (सोशालिस्ट पार्टी इंडिया) – ५ हजार २५८
– नोटा – ३ हजार ७८६
– एकूण वैध मते – ११ लाख ९ हजार ४९६
– पोस्टल बॅलेटमधील अवैध मते – ११०
————-

https://x.com/i/status/1797841218761794000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!